“श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी; सुरक्षिततेसाठी पोलीस, एसआरपीएफ, होमगार्डांचा भक्कम बंदोबस्त”
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसर व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे काटेकोर नजर
तुळजापूर : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव-२०२५ उत्साहात पार पडणार आहे. दिनांक २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतून लाखो भाविक येणार असल्याने संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. मात्र भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मंदिर प्रशासन आणि धाराशिव पोलीस दलाने व्यापक बंदोबस्ताची तयारी केली आहे.
नवरात्र उत्सव काळात तुळजापूर शहर व परिसरात प्रचंड गर्दी उसळते. या गर्दीत चोरी, जबरी चोरी यासारख्या गुन्ह्यांना आळा बसावा तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसर, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, पार्किंग व्यवस्था इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून नियंत्रणासाठी स्वतंत्र सीसीटीव्ही कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामुळे संशयास्पद हालचालींवर त्वरित लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक २, पोलीस उपअधीक्षक १२, पोलीस निरीक्षक २१, सहाय्यक पोलीस निरीक्षक ३९, पोलीस उपनिरीक्षक ४५, पुरुष पोलीस अमलदार ८०५, महिला पोलीस अमलदार २०४, वाहतूक शाखेचे ७ अधिकारी व ५० अमलदार अशी फौज तैनात आहे. याशिवाय एस.आर.पी.एफच्या दोन प्लाटूनसह १२०० पुरुष होमगार्ड आणि २०० महिला होमगार्ड कार्यरत राहणार आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणासाठी पोलीस दलाने विशेष नियोजन केले आहे. नवरात्र महोत्सव काळात भाविकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्ष राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
तुळजाभवानी नवरात्र महोत्सव हा राज्याचा जणू सांस्कृतिक व धार्मिक उत्सव असल्याने लाखो भाविकांसोबतच संपूर्ण प्रशासनाचे लक्ष तुळजापूरकडे लागलेले आहे. “आई राजा उदो उदो”च्या गजरात भक्तीमय वातावरणात होणाऱ्या या महोत्सवासाठी केलेल्या बंदोबस्तामुळे भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शनाचा अनुभव घेता येणार आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












