धाराशिवमध्ये एल सी बी ची अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई…33.95 लाखांचा मुद्देमाल जप्त – एक आरोपी ताब्यात
धाराशिव, (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यात अवैधरीत्या गुटखा व पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी व निर्णायक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या स्पष्ट आदेशानुसार जिल्ह्यात गुटखा विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक धुळे–सोलापूर महामार्गावर गस्त घालत असताना, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ‘सागर 2000’ पान मसाला घेऊन एक टाटा टेम्पो धाराशिवकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ सापळा रचला. तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात संशयित वाहन आढळताच चालकाने वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मदतीने डी-मार्ट, धाराशिव समोर वाहन थांबवण्यात आले.
वाहन चालकास चौकशी केली असता त्याने आपले नाव दीपक दिगंबर पुरी, रा. शिरपूर, ता. मंठा, जि. जालना असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 18,95,880 रुपये किमतीचा ‘सागर 2000’ प्रतिबंधित पान मसाला आढळून आला. टाटा टेम्पोसह एकूण 33,95,880 रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 04/2026 अन्वये भा. न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहा. पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, चालक रत्नदीप डोंगरे तसेच आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खांडेकर, सहा. पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे व त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












