दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऊर्स सर्वांच्या सहकार्याने व उत्साहाने साजरा करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
ऊर्स पूर्वतयारीचा आढावा
धाराशिव दि.22 डिसेंबर (प्रतिनिधी) हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांचा उर्जा साजरा करण्याचे हे 721 वे वर्ष आहे.या उर्समध्ये हिंदू मुस्लिमसह सर्व धर्मांचे भाविक विविध राज्यातून मोठ्या संख्येने ऊर्स साजरा करण्यासाठी एकत्र येतात.हा उर्स एक एकात्मतेचे प्रतीक आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऊर्स सर्वांच्या सहकार्याने व उत्साहाने साजरा करावा.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ऊर्स पूर्वतयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त प्रदीप कुटे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा बांगर मुख्याधिकारी श्रीमती.अंधारे तहसीलदार मृणाल जाधव,जिल्हा वक्फ अधिकारी आमेर,एसटी आगारप्रमुख बालाजी भांगे, महावितरणचे पी.वाय.निकम यांचेसह उर्स आयोजन समितीचे ॲड.काझी परवेझ अहमद,इरफान कुरेशी, मोईनुद्दीन पठाण व फिरोज पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुजार म्हणाले की,नगरपरिषदेने ऊर्सच्या परिसरात स्वच्छता कायम ठेवावी.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.अग्निशमन व्यवस्था या काळात कायम तैनात ठेवावी.वीज भारनियमन या काळात करू नये. महावितरणने आपले तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सेवा या काळात उपलब्ध करून द्याव्यात.अन्न व औषध प्रशासनाने ऊर्समध्ये लावण्यात येणाऱ्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तपासणी करावी.ऊर्समधील रस्त्यांचे पथदिवे रात्रीला पूर्ण सुरू राहतील याची खात्री करावी.रस्त्याची आवश्यक दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी.परिसरात धूळ उडणार नाही यासाठी नगरपरिषदेने ऊर्सच्या रस्त्यांवर पाणी मारावे. ऊर्स परिसरात स्वच्छतेकडे लक्ष देऊन ऊर्ससाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोयी टाळावी.असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती खोखर म्हणाल्या की, संदल मिरवणुकीत डीजेचा वापर होणार नाही.वापर करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल.संदल मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. कोणताही अनुचित प्रकार उर्स दरम्यान होऊ नये यासाठी येणे-जाण्याचा मार्ग प्रशस्त असावा. वाहतूक विस्कळीत होणार नाही यासाठी पोलीस काम करतील.
डॉ.श्रीमती बांगर यांनी यावेळी सांगितले की,ऊर्समध्ये आरोग्य पथक उपस्थित राहणार आहे.भाविकांची आरोग्य तपासणी या दरम्यान करण्यात येणार आहे.विविध स्टॉलवर असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची ओटी चाचणी देखील करण्यात येणार आहे. एक रुग्णवाहिका देखील तैनात राहणार आहे.आवश्यक तेवढा औषध साठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी उर्स आयोजन समितीच्या वतीने उर्स कालावधीत दर्गा परिसरात आतील व बाहेरील भागात साफसफाई करून कब्रस्तानातील काटेरी झाडे तोडण्यात यावी. अशी मागणी केली.रस्त्यांची साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलवरील लाईट दुरुस्ती,संदल मिरवणुकीच्या मुख्य रस्त्यावरील नाल्याची साफसफाई करणे,रस्त्यांवर डीडीटी पावडर टाकणे, कब्रस्तानमधील पोलवर फोकस बसविणे,शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करणे,ऊर्स दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था करणे, कव्वाली मैदानावर दर्ग्यामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते,त्यामुळे महिला पोलीस बंदोबस्त करणे,स्टेजसमोर कव्वालीच्या वेळी पोलीस नियुक्त करणे,भाविकांची संख्या लक्षात घेता रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे एक वैद्यकीय पथकसह ॲम्बुलन्स व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्यावर तसेच खाद्यपदार्थावर तपासणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे,भाविकांना ऊर्ससाठी येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बसची व्यवस्था करणे, बाहेरगावावरून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे स्टेशन ते बसस्थानक ते दर्गा मार्गांपर्यंत ऊस काळापूर्ती बसेसची व्यवस्था करणे अशा विविध मागण्या यावेळी त्यांनी केल्या.












