लोहारा (प्रतिनिधी) – उमरगा तालुक्याचे विभाजन होऊन 27 जून 1999 रोजी लोहारा हा स्वतंत्र तालुका अस्तित्वात आला. गेल्या 26 वर्षांत अनेक प्रशासकीय कार्यालये लोहाऱ्यात उभी राहिली असली तरी दळणवळणाच्या सोयींच्या बाबतीत हा तालुका अद्यापही अपुरा आहे. जवळपास 45 गावांचा समावेश असलेल्या लोहारा तालुक्यात सुमारे 1 लाख 60 हजार लोकसंख्या असून, 1 लाख 10 हजार मतदार आहेत. अशा मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यात प्रवाशांसाठी बस डेपो नसल्यामुळे दररोज प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
जीवनराव गोरे हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना आमदार निधी व महामंडळाकडून मिळून तब्बल 85 लाख रुपयांचा खर्च करून लोहाऱ्यात बसस्थानक उभारण्यात आले. मात्र वाढत्या प्रवासी संख्येमुळे हे स्थानक अपुरे ठरत असून आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची नेहमीच कुचंबना होते.
लोहारा तालुका हा तुळजापूर व अक्कलकोट या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. शेजारी लातूरसारखी मोठी बाजारपेठ असल्यामुळे व्यापार, शिक्षण व उद्योगधंद्यासाठी विद्यार्थ्यांची, व्यापाऱ्यांची तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. महिलाही तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी प्रवास करत असतात. तरीही योग्य बस डेपो नसल्याने लोहाऱ्यातील प्रवासी बाहेरच्या डेपोंवर अवलंबून राहत असल्याचे पाटील यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.
लोहाऱ्यात सध्या सुमारे चार एकर प्रशस्त जागा उपलब्ध असून येथे किमान 50 बसांची सोय करून डेपो उभारला जावा, अशी मागणी स्थानिक पातळीवर सातत्याने होत आहे. या वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करून शिवसेना युवासेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले. धाराशिव दौऱ्यात त्यांनी लोहाऱ्यात तातडीने बस डेपो उभारण्याची आग्रही मागणी पाटील यांनी केली आहे.
प्रवाशांच्या दैनंदिन गैरसोयी लक्षात घेता पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष घालून लोहाऱ्यात बस डेपो उभारावा, अशी अपेक्षा आनंद पाटील यांनी व्यक्त केली आहे.












