धाराशिव बसस्थानक घोटाळ्यावर लोकमदत न्यूज इम्पॅक्ट — विश्रांती कक्षामध्ये पडलेले छत तात्काळ २४ तासांत दुरुस्त…एस टी महामंडळ अधिकारी खडबडून जागे!
धाराशिव दि.१२ (अमजद सय्यद):धाराशिवच्या नव्या बसस्थानकातील स्ट्रक्चरल घोटाळा लोकमदत न्यूज ने उघड केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षातील पीव्हीसी सिलिंग कोसळल्याची बातमी काल (दि.१० ऑक्टोबर) लोकमदत न्यूज ने “धाराशिव बसस्थानकाचा स्ट्रक्चरल घोटाळा उघड! चुकीच्या रचनेमुळेच सिलिंग कोसळले, १० कोटींचे काम धोक्यात; नागरिकांचा संताप उसळला” या मथळ्याखाली प्रकाशित केली होती. अवघ्या २४ तासांच्या आत प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पडलेले छत दुरुस्त करून बसस्थानक (कर्मचारी विश्रांती कक्ष) पूर्ववत केले आहे.
काल पहाटे चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षात मोठी दुर्घटना टळली होती. पहाटेच्या सुमारास अचानक सिलिंग कोसळले, मात्र सुदैवाने ३० ते ४० चालक-वाहकांचा जीव वाचला. रात्री पाणी गळती असल्याचे लक्षात आल्यानंतर ते अन्यत्र झोपायला गेले आणि काही वेळातच वरचा सिलिंग भाग कोसळला. घटनेनंतर बसस्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर बसस्थानकाचे बांधकाम तब्बल १० कोटी रुपयांच्या खर्चाने करण्यात आले असून, फक्त सहा महिन्यांपूर्वीच पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतरही अनेक त्रुटी, दर्जाहीन साहित्याचा वापर आणि पाणी गळतीच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर लोकमदत न्यूज ने मुद्देसूदपणे हे प्रकरण उघडकीस आणले.
बातमी प्रसिद्ध होताच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित ठेकेदार, अभियंते आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व कर्मचारी विश्राम कक्ष येथे पडलेले सिलिंग तत्काळ दुरुस्त करून काम पूर्ण केले. आज रविवार सकाळपर्यंत विश्रांती कक्ष पुन्हा नव्यासारखा दिसत आहे.
या घटनेनंतर नागरिक आणि कर्मचारीवर्गाकडून “लोकमदत न्यूज”च्या कार्याचे कौतुक होत आहे. “पत्रकारितेची ताकद म्हणजे हेच — प्रशासन हलते जेव्हा लोकमदत न्यूज घोटाळा उघड करते!” असा प्रतिसाद नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, प्रामाणिक पत्रकारितेमुळे प्रशासनाला उत्तरदायी बनवता येते आणि दुर्लक्षित प्रश्नावर तात्काळ उपाय होऊ शकतो. बसस्थानकातील अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी आता पुन्हा चर्चा रंगू लागली असून, जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786















