गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे!
आमदार कैलास पाटील यांनी केली तुळजापूर तालुक्यातील पिकांची पाहणी
धाराशिव ता 27: जिल्हयामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी झाल्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत. तुळजापूर तालुका देखील याला अपवाद नाही. या नुकसानीची आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत तुळजापूर तालुक्यातील शहापूर निलेगाव गुजनूर, वागदरी, नळदुर्ग, जळकोट, जळकोटवाडी येथे तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली. आज गणेशाच आगमण होत असल्याने विघ्नहर्ता गणेशाकडे आमदार पाटील यांनी सरकारला सु्बुद्धी देण्याची प्रार्थना केली. एवढं नुकसान होऊनही सरकारचा प्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असेल तर शेतकऱ्यांनी करायच काय असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
तुळजापूर तालुक्यामध्ये सरासरी 257 मिमी पावसाची नोंद झाली असून त्यात नळदुर्ग महसुली मंडळामध्ये 316 मिमी, जळकोट 252 मिमी पाऊस पडून अतिवृष्टी झालेली आहे. शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोयाबीन पिकावर मुळकुज, मानकुज आणि शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सोयाबीन जरी दिसायला हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळे सर्वच पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करावेत,एकाही शेतकऱ्यांचे नुकसान होऊन तो मदतीपासुन वंचित राहीला तर याची जबाबदारी सर्वस्वी या सरकारची व प्रशासनाची असणार आहे. त्यामुळे गणराया या सरकारच्या लोकांना व प्रशासनास बळीराजांच्या पाठीशी राहण्याची सु्बुद्धी दे अशी प्रार्थना आमदार पाटील यांनी केली आहे.












