पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावली मातोश्री
पाच दिवसांपासून सुरवसे करतात जीवनावश्यक किटचे वाटप
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) – सध्या जिल्हाभरात अतिवृष्टी व ढग फुटी सदृश्य पाऊस होत आहे. त्यामुळे परांडा व भूम तसेच इतर भागात नदीला पूर आल्यामुळे अनेकांच्या घराला पुराच्या पाण्याने घेरले आहे. तर या पाण्याने चौघाजणांना आपल्या कवेत घेतले आहे. तसेच पुरात अनेकांचे संसार वाहून तर गेले आहेत त्याबरोबरच शेकडो जनावरे देखील वाहून गेली व काही दावणीलाच मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे पुराच्या तडाख्याने हाहाकार माजलेला आहे. अनेकांना खाण्यास अन्नाचा कण देखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे अशा संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट तसेच रोख रक्कम आणि कपडे आदी साहित्य पुरविण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य मातोश्री हॉटेलच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून सुरू केलेले आहे. आजचा त्यांचा पाचवा दिवस असून त्यांनी आतापर्यंत १२०० किटचे वाटप केलेले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीला मातोश्रीचा घास आणि संकटाच्या काळात मायेची उब, आधाराचा व प्रेमाचा घास भरविणारा ठरला आणि ठरत आहे.
धाराशिव जिल्ह्यात दि.१९ सप्टेंबरपासून सलग अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २२० छोटे-मोठे धरण आणि तलाव तुडुंब भरले. तर तेरणा, सिना, मांजरा, चांदणी, उल्फा, बाणगंगा, रामगंगा आदी नद्या तुडूंग भरून राहिल्या. या नद्यात वाहणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या नद्यांनी आपली पातळी ओलांडत कडेवर असलेल्या गावात आपला विस्तीर्ण मोर्चा ओळविला. त्यामुळे या काठालगत असलेल्या गावात पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. तर घरामध्ये असलेले सर्व साहित्य पाण्याबरोबर वाहून गेले असून जे आहे ते भिजून सडलेले आहे. अद्यापही काही घरांमध्ये कमरे इतके पाणी असून या नागरिकांना घरात प्रवेश देखील करता आलेला नाही. तर ज्या घरातील पाणी ओसरलेले आहे. त्या घरात गुडघ्या इतका चिखलाचा खच व सडा पडलेला आहे. विशेष म्हणजे या पुराच्या पाण्याबरोबर साप, अजगर आणि विंचू घरात शिरलेले आहेत. त्यापैकी एकाला सापाने दौश केल्याने त्या व्यक्तीचा जागीच तर पडून मृत्यू झाला. तसेच शेती व शेतातील सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, मका आणि ऊस आदींसह इतर पिकांची अतोनात हानी झाली आहे. शेतात तर कमरे एवढे खड्डे पडलेले असून पिके मातीसह वाहून गेलेली आहेत. अशा संकटाच्या काळात या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी जी शक्य होईल त्या मदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. याची जाण असलेल्या धाराशिव शहरातील मातोश्री हॉटेलचे मालक मनोज सुरवसे हे दि.२३ सप्टेंबरपासून परंडा, भूम, कळंब आणि धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांसह संकटग्रस्त आणि निराधार कुटुंबांना ५ किलो गव्हाचे पीठ, शेंगदाणे, साखर, चहा पावडर, खाद्यतेल, खोबरेल तेल, बेसन, रवा, मैदा, निरमा, मोहरी, चुरमुरे, फरसाण, तूर डाळ, मूग डाळ, शाबूदाणा, अंगाचा आणि कपड्याचा साबण, टूथपेस्ट आदींसह शतरंजी, ब्लॅंकेट व चादर जीवनावश्यक वस्तूंचे किट असलेले साहित्य त्यांनी चार चाकी गाड्यांमध्ये पूरग्रस्त भागात जाऊन दररोज गरजवंत असलेल्या व्यक्तींना स्वतः वितरण करीत आहेत. त्यांनी सिरसाव, पाथरुड, चिंचपूर, बेलगाव, पिंपळगाव, अंतरगाव, विडा, लाखी, नालगाव, वडनेर, देवगाव (खुर्द), वांगे गव्हाण, म्हात्रेवाडी, गोगलगाव, कारंजा, पिंपरी, ढग पिंपरी, लोहारा आदींसह इतर गावात त्यांनी १२०० किटचे वितरण संकटग्रस्तांना वाटप करुन त्यांना घास भरविण्याबरोबरच मायेची ऊब देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले आहे. मनोज सुरवसे यांनी खरा मातोश्रीचा आधार काय असतो ? हे प्रत्यक्षात कृतीद्वारे दाखवून दिलेले आहे. त्यामुळे इतरांनी अशा आसमानी संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
सुरवसे यांनी इंस्टाग्रामवर केलेल्या आवाहनास अनेकांचा प्रतिसाद मिळत असून अहिल्यानगर येथील आष्टी येथील दानशूर उद्या दि.२९ सप्टेंबर रोजी जीवनावश्यक वस्तूंचे किट घेऊन येणार आहेत. तर इतर देखील मदत गोळा करण्याच्या कामाला लागलेले आहेत. त्यामुळे अनेक दानशूर यांनी अशा संकट समयी आपल्या स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबावर आलेले संकट असल्याचे समजून मदतीसाठी पुढे येणे गरजेचे बनले आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












