चार वर्षे गायब, निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा “कळवळा”! – समाजसेवकांचा अचानक उगम, एलईडी लाईट, बॅनरबाजी आणि १० रुपयांच्या जारमागील राजकारण…
धाराशिव (अमजद सय्यद):चार वर्षे जनतेपासून दुरावलेले, फोन न उचलणारे आणि शहरातील समस्यांकडे पाठ फिरवणारे कार्यकर्ते आता निवडणुकीच्या तोंडावर अचानक “जनतेचा कळवळा” दाखवत आहेत. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच शहरभर समाजसेवेचा सुळसुळाट दिसत आहे.
कोणी एलईडी लाईट बसवून नागरिकांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे, तर कोणी फक्त प्रभागापुरते मर्यादित राहून १० रुपयांत पाण्याची जार घरपोच देत “आम्ही तुमचेच लोक” असा बनाव करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “सेवाभाव” दाखवणाऱ्या या कार्यकर्त्यांनी चार वर्षांत एकाही कामाकडे लक्ष न देता आता अचानक समाजसेवकाचे रूप धारण केले आहे.
शहरातील काही ठिकाणी बॅनरबाजी, सोशल मीडियावर रीलद्वारे “जनतेचा सेवक” असल्याचा दिखावा, तसेच ठेकेदार ते समाजसेवक असा झालेला बदल पाहून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एरवी स्वतःच्या पैशातून एक रुपया न खर्च करणारे कार्यकर्ते आता मात्र पाचशे रुपयांची लाईट बसवून हजारो रुपयांचा खर्च करून रील्स च्या माध्यमातून “लोकप्रतिनिधी” बनण्याचा प्रयत्न करत आहेत.
जनतेला केवळ निवडणुकीत आठवण करणाऱ्या अशा तात्पुरत्या कार्यकर्त्यांना यावेळी मतदार योग्य धडा शिकवतील, असा सूर नागरिकांच्या चर्चेतून उमटत आहे.
धाराशिव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीत “जनतेचा कळवळा” दाखवणाऱ्यांना मतदारांकडून नेमका कोणता संदेश मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












