धाराशिव अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार-आमदारांचे निवेदन
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, मका, फळबागा, ऊस यासह इतर पिके उद्ध्वस्त झाली असून नद्या-नाले तुडुंब भरल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांना उभा हंगाम वाया गेला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी व मजुरांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
धाराशिव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील बदललेले निकष रद्द करून जुने निकष कायम ठेवावेत.
मिरज-कोल्हापूरप्रमाणेच अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करावी.
पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुल, बंधारे, तलाव व वीज यंत्रणा तातडीने दुरुस्त करावी.
जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना, बहुभुधारक शेतकऱ्यांसह मदत द्यावी.
पुरात वाहून गेलेल्या पशुधनाची बाजारमूल्यानुसार भरपाई करावी.
घर, जनावरांचे गोठे व मजुरांची घरे पडझड झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.
या सर्व मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












