नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुकीची प्रक्रिया नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ज भरण्याची तारीख १० ते १८ नोव्हेंबर, अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर, मतदानाची तारीख २ डिसेंबर तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. राज्यातील विविध नगरपरिषदांमध्ये या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना आता वेग येणार आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी प्रचाराची तयारी सुरू केली असून, पक्षीय तिकीटांच्या वाटपाचीही चुरस दिसत आहे. या निवडणुकीत स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा हेच प्रमुख मुद्दे राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काही दिवसांत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.












