धाराशिव दि.११ (अमजद सय्यद) – शहरातील नगर परिषद प्रशासनात मागील दोन महिन्यांपासून अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच मुख्याधिकारी म्हणून कोण जबाबदारी करणार आणि कार्य तडीस नेणार ? यावर राजकीय खलबते रंगविले जात होते. अशा वादग्रस्त काळामध्ये बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी नगर परिषदेची मुख्याधिकारी म्हणून सूत्रे हातात घेतलेली आहेत. त्यांच्यापुढे नगर परिषद प्रशासनात सूत्रता आणण्याबरोबरच अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय साधून त्यांची एकत्र मूठ बांधण्याचे मोठे कसरात्मक आव्हान उभा ठाकलेले आहे. कारण महिला अधिकारी अन् स्थानिक नेत्यांचे राजकारण यामुळे नवा गडी जुनेच मुद्दे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधून विश्वास निर्माण करणे गरजेचे. तर मागील परिस्थिती पाहता नगर प्रशासन कारभारामध्ये असलेला अंधार दूर करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी नूतन मुख्याधिकारी अंधारे यांच्यावर आली असून त्या कशी पार पाडतात ? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांची प्रशासकीय कारण देत दि.३० जून रोजी बदली करण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकारी पदाचा कारभार नगर प्रशासन सहाय्यक आयुक्त त्रिंबक डेंगळे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी यापूर्वी याच नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारीपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावल्यामुळे त्यांची किमान तीन वर्षांपर्यंत अतिरिक्त प्रभारी कार्यभार सांभाळतील असा कयास राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत होता. मात्र दि.३१ जुलै रोजी सामान्य प्रशासन विभागाने बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीता अंधारे यांची धाराशिव येथे बदली केली आणि त्यांनी दि.४ ऑगस्ट रोजी तत्काळ पदभार स्वीकारला. त्याबरोबरच नगर प्रशासनातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज पवार यांची बदली, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीनंतरचा पदभार बदल, बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता संदीप दुबे यांची बदली, आरोग्य निरीक्षक कौस्तुभकुमार घडे यांची बदली व मुख्य लेखापाल अशोक फडतरे यांची प्रशासकीय कारणास्तव झालेली बदली यासह इतर हालचालींमुळे प्रशासनात जवळपास सर्वच विभागांमध्ये नवीन अधिकारी आलेले आहेत. त्या जादुई बदलामुळे प्रशासनातील नव्या टीमसमोर आव्हाने असून धाराशिव नगरपरिषदेत अल्पावधीतच अनेक बदल झाले आहेत, अशा अनेक हालचालींमुळे प्रशासनात जवळपास सर्वच विभागांत नवे अधिकारी आले आहेत त्यामुळे नूतन मुख्याधिकारी यांना प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये समन्वय राखण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
सध्या मुख्याधिकारी अंधारे यांच्यासह कार्यरत असलेले सर्व नवीन विभागप्रमुख अधिकारी ज्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा अभियंता असलेलेले प्रदीप स्वामी यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता म्हणून दिलेली जबाबदारी त्यांच्या सोबतच नाशिक येथून बदली होऊन आलेले (“क” दर्जा) विष्णू सानप, संग्राम भापकर – पाणी पुरवठा अभियंता, रोहित मुंढे – पाणी पुरवठा अभियंता तात्पुरता पदभार वीज पुरवठा अभियंता, तनवीर जमादार मुख्य लेखा परीक्षक आणि स्वप्नील सुर्यवंशी – सहाय्यक लेखा परीक्षक , गणेश मेहर – स्वच्छता विभाग निरीक्षक या सर्वांचा समन्वय साधून त्यांची मोट बांधण्यासह सुरळीत प्रशासन चालविण्याचे मोठे आव्हान मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या समोर निर्माण झाले आहे.











