धाराशिवच्या रुग्णालयांना नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा ‘मॉडेल टच’ अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी ऐतिहासिक पाऊल : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय तसेच ५०० खाटांचे शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही संस्थांमध्ये नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर अद्ययावत व अत्याधुनिक सोयी सुविधा विकसित करण्यासाठी अनमोल मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असलेली अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित निदान व उपचार पद्धती, रुग्णाभिमुख पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, तसेच नियोजनबद्ध कार्यपद्धती या सर्व आदर्श बाबींची अंमलबजावणी धाराशिव येथील या दोन्ही शासकीय आरोग्य संस्थांमध्ये राबविण्याची तयारी इन्स्टिट्यूटने उत्स्फूर्तपणे दर्शवली आहे. त्यामुळे धाराशिवमधील आरोग्यसेवेची गुणवत्ता आणि दर्जा केवळ जिल्हास्तरावर न राहता राज्य व देशपातळीवरील होण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांची नागपूर येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या दोन्ही रुग्णालयांच्या इमारती, अंतर्गत रचना, उपकरणांची मांडणी, रुग्णसेवेची प्रणाली व मनुष्यबळाचे नियोजन हे सर्व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर विकसित करण्याची विनंती आमदार पाटील यांनी केली. या विनंतीला जोगळेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते मार्गदर्शन व तांत्रिक सहकार्य देण्याची तयारी दर्शवली. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये प्रत्येक पेशंट सोबत एक आरोग्य सेवक जोडून देण्यात येतो, जो त्या रुग्णासाठी डॉक्टरांच्या वेळ घेणे, त्यासाठी आवशयक असलेल्या तपासणी व इतर अनुषंगिक बाबीसाठी मदत करतो. अगदी त्याच पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले आहे.
या पुढील टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्यासह बांधकाम विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता, वास्तुविशारद आणि कंत्राटदार यांचा समावेश असलेले पथक लवकरच नागपूर येथे भेट देणार आहे. या दौऱ्यात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील इमारत रचना, वैद्यकीय यंत्रसामग्रीची मांडणी, रुग्णवाहतूक व्यवस्था, आपत्कालीन सेवा, आयसीयू, ऑपरेशन थिएटर, स्वच्छता व देखभाल व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर धाराशिव येथील प्रकल्पात त्या सर्व बाबी प्रभावीपणे कशा राबवता येतील, याचा आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील रुग्णांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून, किफायतशीर, वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाचा दर्जाही उंचावणार असून, जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत ही योजना एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत व्यक्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.
















