वाशी दि.०७(प्रतिनिधी):फैजाने रजा मस्जिद, आदर्श नगर वाशी तसेच मुस्लिम समाज आणि जीव रक्षा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशे व्या जयंतीनिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात अचूक शंभर लोकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली कर्तव्यनिष्ठा बजावली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता झाली. या वेळी गावातील सर्व मान्यवर राजकीय नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, गावकरी बांधव, मुस्लिम समाजातील कार्यकर्ते, जीव रक्षा ग्रुपचे सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व आदरणीय डॉक्टर व त्यांचे सहकारी, पत्रकार बंधू तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने केवळ रक्तदानच नव्हे, तर मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. पैगंबरांनी दिलेल्या संदेशांमध्ये – व्याज घेणे हे मोठे पाप असून त्यापासून दूर राहावे, स्त्री-पुरुष दोघांसाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे, पालकांची सेवा करणे हा सर्वांत मोठा सन्मान आहे, स्त्रियांना सन्मान द्यावा, गरीब-अनाथ-विधवा आणि गरजूंना मदत करावी, खोटे बोलणे व फसवणूक करणे टाळावे, शत्रूंनाही माफ करावे, स्वच्छतेला अर्धा इमान मानावे, शेजाऱ्यांशी चांगले वागावे, नशा व दारूपासून नेहमी दूर राहावे, तसेच धर्म, जात, पंथ बाजूला ठेवून मानवतेचा संदेश देऊन प्रेम, दया आणि न्यायाने समाजात राहावे – अशा जीवनमूल्यांचा सखोल उल्लेख करण्यात आला.
याच निमित्ताने १५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लोकांना किमान एक तरी झाड आपल्या घराच्या अंगणात लावावे असा संदेश दिला. त्यानंतर झाडांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाची ग्वाही देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जीव रक्षा ग्रुपचे कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. पत्रकार बांधवांनी या सामाजिक उपक्रमाची माहिती समाजामध्ये पोहोचवली, तर शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
या सामाजिक उपक्रमातून मानवतेचा, पर्यावरण संवर्धनाचा, रक्तदानाचा आणि एकतेचा संदेश समाजामध्ये पोहोचला असून गावकऱ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमामध्ये फैजाने रजा मस्जिद व कमिटी व मुस्लिम समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












