धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंग कायम… नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संगनमताचे आरोप!
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग आणि पोस्टर्सने अक्षरशः झुडुपं माजवली असून शहर विद्रूपीकरणासोबतच न्यायालयीन व प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना शहरप्रमुख अभिराम कदम, माजी नगरसेवक राणा बनसोडे आणि प्रवीण केसकर यांनी 23 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहर होर्डिंगमुक्त करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने सहआयुक्त नगर परिषद प्रशासन व अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्फत धाराशिव नगरपरिषदेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. परंतु नगरपरिषदेकडून या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली असून अद्याप शहरातील एकही अनधिकृत होर्डिंग हटवले गेलेले नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2017 रोजी जनहित याचिकेवरील निकालात अनधिकृत जाहिराती व होर्डिंग तात्काळ काढण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. तसेच महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने 14 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णयाद्वारे या आदेशाला बळ दिले होते. तरीही धाराशिव नगरपरिषदेकडून या आदेशाचे पालन झाले नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा भंग होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील काही कर्मचाऱ्यांचे होर्डिंगवाल्यांशी अर्थपूर्ण संगनमत असल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित कर्मचाऱ्यांकडून उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात असल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले. यामुळे नगरपरिषदेची प्रतिमा मलिन होत असून कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नीता अंधारे यांना धाराशिव शहरातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दिशाभूल आणि चुकीची माहिती देऊन उडवा उडविचे उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
निवेदनकर्त्यांनी इशारा दिला आहे की अनधिकृत होर्डिंग तात्काळ काढले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक आणि राजमाता जिजाऊ चौक येथे 10×20 आकाराचे डिजिटल बॅनर लावण्यासाठी विनाशुल्क कायमस्वरूपी परवानगी द्यावी, अशी मागणीही आज दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
शहरातील बेकायदेशीर होर्डिंगांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई करून धाराशिव शहर होर्डिंगमुक्त करावे आणि शहरवासीयांना मोकळा श्वास घेण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी तालुका प्रतिनिधी नेमने आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा. संपादक अमजद सय्यद 8390088786












