सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा गरजू वधु – वरांच्या पालकांनी लाभ घ्यावा – विश्वासअप्पा शिंदे
धाराशिव – मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत धाराशिव येथे मोफत जिल्हास्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व पूरग्रस्त कुटुंबातील पालकांनी आपल्या वधु – वरांची नोंदणी करून या विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे मार्गदर्शक विश्वासअप्पा शिंदे यांनी केले आहे.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची नुकतीच निवड झाली आहे. समितीचे हे 36 वे वर्ष असून जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे अनेक शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीमुळे उपवर मुला – मुलींचे विवाह कसे पार पाडायचे? असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी प्रथमच सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6.25 वाजता हा सोहळा होणार असून इच्छुक वधु-वराच्या पालकांनी 15 जानेवारी 2026 पर्यंत नावनोंदणी करावी. आणि जास्तीत जास्त गरजू कुटुंबांनी आपल्या उपवर वधु – वरांची नोंदणी करून विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवहन समितीचे मार्गदर्शक विश्वासअप्पा शिंदे यांनी केले आहे.
*विवाह सोहळ्यात मिळणार या सुविधा*
सामुदायिक विवाह सोहळ्यात वधु-वरांना मणी मंगळसूत्र, जोडवे, दिवाण, वधु-वरांचे वस्त्र, रूकवत देण्यात येणार असून वर्हाडी मंडळींच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.











