धाराशिव (प्रतिनिधी):जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला आहे. अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली आहे. पुराच्या पाण्यामुळे विहिरी गाळाने भरल्या आहेत तर काही ठिकाणी शेतातील ड्रिपसेटही वाहून गेले आहेत. प्रशासनाला या सगळ्या बाबींचे तातडीने पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या असून पंचनामे सुरु देखील करण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनीही आपापल्या परिसरात झालेल्या नुकसानीची तक्रार संबंधित तलाठ्यांकडे तातडीने दाखल करावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
कळंब तालुक्यातील खोंदला गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आपल्या एका सहकाऱ्याच्या अद्यापही शोध सुरूच आहे. दुर्दैवाने या शोधकार्यात अद्यापपर्यंत आपल्याला यश आलेले नाही. तेरणा धरण शंभर टक्के भरले आहे. मांजरा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. मांजरा धरणात देखील मोठ्या वेगाने पाणी दाखल होत असल्याने लवकरच मांजरा धरणही शंभर टक्के भरेल अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मोठा पाऊस झाला आहे. कळंब आणि परिसरातील पावसाची आकडेवारी अभूतपूर्व आहे. इटकूर परिसरात मागील चाळीस वर्षांत असा पाऊस झाला नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. इटकूर गावातील पुलावर जवळपास ५ तास दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली असल्याचे दिसत आहे. नदीकाठी असलेल्या शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. सर्व तहसीलदार आणि तलाठ्यांसोबत तातडीने संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात देखील झाली आहे. शेतकरी बांधवांनीही तलाठ्यांकडे तातडीने नुकसानीच्या तक्रारी सादर कराव्यात कराव्यात, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
अनेक भागात जनावरे दगावली असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. शेतकरी बांधवांनी नुकसानीची माहिती आणि जनावरे दगावली असल्यास याबाबतही तातडीने तक्रारी सादर कराव्यात. पुढील दोन- तीन दिवस आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. बहुतांश बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. अनेक साठवण तलाव, मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे पुढील पाऊस जास्त नुकसानकारक ठरण्याची भीती आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी व आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणा नंतर कुठल्याही प्रशासकीय बैठकीला हजेरी न लावता तातडीने बांधावर जाऊन उद्भवलेल्या पूर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी केली. सगळी माहिती जाणून घेतली. प्रशासनाला युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.













