नगर परिषदेच्या करांचा भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी नीता अंधारे
धाराशिवकरांची शास्ती करापासून होणार मुक्तता
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) – नगर परिषदेचा मालमत्ता कर भरण्यासाठी करधारकांना वेगवेगळ्या अडचणी येतात. त्यामुळे नगर परिषदेचा कर वेळेवर भरू शकत नाहीत. त्यामुळे ते थकीत राहिल्यास त्या करावर प्रती महिना दोन टक्के शास्ती कर आकारला जातात. परिणामी जास्ती मालमत्ता कराचा बोजा वाढतो. तो बोजा वाढू नये व मालमत्ता धारकांना दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने शास्ती कर माफ करण्यात आला आहे. त्यासाठी विशेष अभय योजना सुरु केली असून ही योजना दिलासादायक आहे. त्यामुळे या दिलासादायक अभय योजनेचा जास्तीत जास्त मालमत्ता धारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केले आहे.
५० टक्के शास्ती सवलतीचा मिळणार लाभ
पुढे बोलताना मुख्याधिकारी म्हणाल्या की, थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी अभय योजना जाहीर केली आहे. राज्यातील नगर पालिका, नगर परिषदा व नगर पंचायत क्षेत्रामध्ये अनेक वेळा मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम जास्त असणे, मालमत्ता करधारकांची आर्थिक अडचण असणे व इतर कारणामुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही. तसेच महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १५० (अ)(१) नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर संबंधित नगर परिषद व नगर पंचायत यांच्याकडून दरमहा २ टक्के शास्ती लावण्याचे प्रावधान आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांच्या एकूण थकबाकीमध्ये वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम थेट कर वसुलीवर होतो. त्यावर पर्याय म्हणून नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ केला. तर कर वसूल करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी नगर पालिका, नगर परिषद व नगर पंचायती क्षेत्रातील मिळकत धारकांसाठी दि. १९ मे २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने मालमत्ता करावरील शास्ती माफ करीत अभय योजना प्रोत्साहनात्मक राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमध्ये दि.१९ मे रोजी ज्या थकीत मिळकत धारकांची शास्ती थकबाकी आहे, अशा मिळकत धारकास महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती अधिनियम १९६५ चे कलम १५० (क) नुसार थकीत मालमत्ता करावरील शास्ती अंशतः पूर्णता माफ करण्यासाठी थकीत मालमत्ता करांची पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे.
जे मिळकतधारक शास्ती वगळता इतर थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरतील त्यांच्या बाबतीतच ५० टक्के शास्तीच्या सवलतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. जे अभय योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी विहित नमुन्यात शास्तीमध्ये अंशतः किंवा पूर्णतः सवलत मागणीसाठी परिपूर्ण अर्ज विहित नमुन्यात नगर परिषदेकडे देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे दि. १९ मे नंतरच्या थकबाकी शास्तीस अभय योजना लागू राहणार नाही. प्रस्ताव सादर करताना आधार कार्ड, मालमत्ता कराच्या मागणी बिल व संपूर्ण कराची भरलेली रक्कमेची पावती आदींच्या छाया प्रत जोडणे आवश्यक व अनिवार्य तसेच बंधनकारक आहे. तसेच २०२५-२६ ची मालमत्ता कर बिले तयार होऊन बिले वाटपाचे काम सुरू असून ज्या मालमत्ताधारकांना अद्यापही बिले मिळाली नसतील. त्यांनी आपल्या भागातील वसुली कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून ती बिले प्राप्त करून घ्यावीत. तसेच ती अर्जासोबत विहित मुदतीत दि.३० ऑक्टोबरपर्यंत नगर परिषदेत प्रत्यक्ष सादर करावीत. त्यामुळे शास्ती वगळता थकीत मालमत्ताकरांचा तात्काळ एक रकमी भरणा करून जास्तीत जास्त नागरिकांनी शास्ती माफी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी अंधारे यांनी केले आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












