एम आर आय मशीन सुरु करण्यास परवानगीच मिळेना !
तज्ञांच्या टीमचा तपासणी करण्यास टाळाटाळ का ?
रुग्णांची परवड अन् नेतेगिरी श्रेयवादात गुरफटली !
राज्यातील १७ रुग्णालयांतील भयानक वास्तव !
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) – कोणत्याही कुटुंबाचे आरोग्यमान चांगले असेल तर ते कुटूंब सुखी आणि समृद्ध समजले जाते. तसेच जिल्ह्यातील नागरिक आरोग्य संपन्न असतील तर तो जिल्हा देखील तरुण व आरोग्य संपन्न समजला जातो. आरोग्य विभागांतर्गत वेगवेगळ्या आधुनिक मशनरीच्या साह्याने रुग्णांना कोणत्या प्रकारच्या व्याधी आहेत ? याचे निदान केले जाते. अत्यंत गंभीर व संवेदनशील आजार जडलेल्या रुग्णांच्या आजाराचे निदान होण्यासाठी एमआरआय करणे अत्यंत गरजेचे असते. धाराशिव येथील जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात ऑगस्टमध्ये एमआरआय मशीन सेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र, अद्यापही ती करण्यात आलेली नाही. कारण त्या मशीनची तपासणीची जबाबदारी असलेल्या तज्ञ टीमने आजपर्यंत धाराशिवला येणे टाळले असून अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. ही अवस्था फक्त धाराशिव जिल्हा सामान्य रुग्णालयाचीच नाही तर राज्यातील तब्बल १७ जिल्हा रुग्णालयांची असून रुग्णांची अक्षरशः परवड होत आहे. मात्र, राजकीय नेते मंडळी रुग्णांच्या असह्य वेदना सुसह्य करून दिलासा देण्याऐवजी ते श्रेयवादात गुरफटलेले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याचा देखील जिल्ह्याचा समावेश आहे हे विशेष म्हणावे लागेल.
धाराशिव येथील जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात एमआरआय मशीनची सेवा रुग्णांना देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त (मुंबई) व कृष्णा डायग्नोस्टिक कंपनी (krasnna) पुणे यांच्यामध्ये दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी करार करण्यात आला असून या कंपनीला ठेका दिलेला आहे. ही मशीन संबंधित कंपनीच्या माध्यमातून रुग्णालयास उपलब्ध करून देऊन रुग्णांच्या विविध ५५ प्रकारच्या आजारांचे निदान त्या मशीनच्या माध्यमातून करणे अपेक्षित आहे. ती सेवा ऑगस्टपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, संबंधित कंपनीने देखील ती मशीन जिल्हा रुग्णालयास उपलब्ध करून दिली नव्हती. त्यामुळे रुग्णालयाच्यावतीने अद्याप मशीन का पाठवली नाही ? असे पत्राद्वारे विचारताच झोपेचे सोंग घेतलेल्या कंपनीने जागे होत दि.२२ सप्टेंबर रोजी एमआरआय मशीन पाठवून दिली. ती मशीन आली असून त्या मशीनमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर आणि सर्वर अपलोड केलेले आहेत का ? नियमांचे पालन झाले आहे का ? याची तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाच्या तज्ञ टीमवर सोपवण्यात आली आहे. त्या टीमने लवकर येऊन तपासणी करून सेवा सुरू होईल या उद्देशाने जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून दि. ९ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाला पत्र पाठवून टीम पाठवून देण्याची मागणी केली आहे. परंतू ती अद्यापपर्यंत आली नसल्यामुळे त्या टीमला धाराशिवला येणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे, हीच ती विसरुन गेली आहे की काय ? तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी तपासण्यासाठी जाऊ देत नाहीत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालय, तालुकास्तरावर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविल्या जातात. एकाही शासकीय रुग्णालयांमध्ये एम आर आय मशीन नसल्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या अत्यंत महागड्या तपासण्या करून घेण्याची दुर्दैवी वेळ रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकावर ओढावली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणणारी मंडळी फक्त श्रेय वादात मिरवत असून रुग्ण महागड्या सेवा घेऊन होरपळत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूरचा देखील समावेश !
ज्या जिल्हा रुग्णालयांमध्ये एम आर आय मशीन अद्याप पर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही, असे राज्यातील १७ जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये धाराशिवसह जालना, नांदेड, भंडारा, बुलढाणा, अमरावती, परभणी, हिंगोली, अहमदनगर (अहिल्यानगर), वर्धा, वाशिम, बीड, धुळे, नाशिक, नंदुरबार, नागपूर आणि सेवा रुग्णालय कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेला नागपूर जिल्हा देखील वंचित राहीलेला आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












