पालकमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाची केराची टोपली?
अधिकाऱ्यांचा गोलमाल की “कला केंद्राची” नवी कला?
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) :जिल्ह्यात अवैध धंदे, बेकायदेशीर कृत्ये आणि सांस्कृतिक नावाखाली चालणारा धिंगाणा यावर आळा घालण्याचा स्पष्ट संदेश पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिला होता. त्यानंतर धाराशिव तालुक्यातील आळणी शिवारातील “पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र” या संस्थेविरोधात जिल्हा प्रशासनाने परवाना रद्द करत कारवाई केल्याची घोषणा केली.
मात्र प्रत्यक्षात या कारवाईचा फक्त “फोटोसेशन” पुरता दिखावा झाल्याचे चित्र समोर येत आहे. प्रशासनाने ८ ऑक्टोबर रोजी केंद्र बंद केल्याचे सांगितले असले, तरी जाग्यावरचे वास्तव काही वेगळेच आहे. कला केंद्राच्या समोरील गेटवर “दिवाळीनिमित्त व तांत्रिक कारणास्तव बंद” असा बॅनर दाखविला आहे. पण पाठीमागील दोन दरवाजे मात्र खुले असून, यामुळे परिसरात वेगळीच चर्चा सुरू आहे.
कारवाई की फक्त कागदोपत्री शो पीस?
प्रशासनाने माध्यमांत “पिंजरा कला केंद्र बंद” असा गाजावाजा केला, पण सीलबंदी प्रत्यक्षात झालीच नाही. परवाना रद्द होऊन तीन दिवस उलटले तरी संबंधित ठिकाणी अधिकृत सील लावण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे “प्रशासनाने नेमकी कोणती कारवाई केली?” हा प्रश्न नागरिकांमध्ये चांगलाच गाजत आहे.
पालकमंत्र्यांची दिशाभूल?
पालकमंत्र्यांनी अवैध धंद्या विरोधात शून्य-सहिष्णुता धोरण जाहीर केले असताना, त्यांच्या आदेशालाच जिल्हा प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याची चर्चा रंगली आहे. प्रशासनाने केवळ बाह्य दिखावा करून वास्तविक परिस्थिती लपवली असल्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
जिल्हा प्रशासनातील ‘कलाबाज’ कोण?
समोरून बंद आणि पाठीमागून सुरू असलेली ही कारवाई म्हणजे सरळसरळ गोलमालच असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत. अधिकाऱ्यांच्या या “कलाबाजीमुळे” संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे हात या प्रकरणात बरबटलेले असल्याचा आरोप जनतेतून होत असून, हे प्रकरण नेमके कोणाच्या सांगण्यावरून थांबवण्यात आले किंवा सीलबंद कारवाई कधी होणार ? याचा शोध वरिष्ठ पातळीवर घेणे गरजेचे आहे.
“परवाना रद्द केल्यानंतरही कला केंद्र चालू असेल! तर ही कारवाई खोटी की प्रशासनची लपवालपवी?” याचा खुलासा होणे प्रशासनाच्या नव्हे तर यामध्ये होरपळणाऱ्या अनेक कुटुंबाच्या भल्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786
















