धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीवरून राजकीय रंगत.. ओबीसी महिलांसाठी आरक्षणामुळे अनेकांची स्वप्ने चकनाचूर, पण ….हे आहेत प्रमुख नवे दावेदार!
धाराशिव दि. ०६ ऑक्टोबर २०२५ (अमजद सय्यद) :धाराशिव नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्व शहरवासीयांचे डोळे लागले असून राजकीय वर्तुळात याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील कार्यकाळात नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण पुरुषांसाठी आरक्षित होते. त्यावेळी शिवसेना पक्षाचे मकरंदराजे निंबाळकर हे बहुमताने निवडून आले होते. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यानंतर तीन ते चार वर्षे नगरपालिकेवर प्रशासकिय कारभार चालू होता.
मात्र आज मुंबई मंत्रालयात झालेल्या सोडतीत धाराशिव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे सर्वसाधारण पुरुष नगराध्यक्ष होईल या अपेक्षेने तयारी करणाऱ्या तसेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केलेल्या नेत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. तरीदेखील आता ओबीसी महिला आरक्षणामुळे नवे समीकरण तयार झाले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट चुरस होण्याचे संकेत दिसत आहेत.
भाजपकडून सौ. नेहा राहुल काकडे प्रबळ दावेदार!
महायुतीकडून, विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून या पदासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांच्या पत्नी सौ. नेहा राहुल काकडे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. याआधी राहुल काकडे यांच्या मातोश्री सुनंदा हरिभाऊ काकडे नगरसेवक राहून प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांतूनही नेहा काकडे यांना जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे संकेत आहेत. शेवटी या उमेदवारीवर भाजप नेते व आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा निर्णय अंतिम ठरणार आहे.
महाविकास आघाडीतील रस्सीखेच!
महाविकास आघाडीत मात्र काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार हे निश्चित झाले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून दोन टर्म नगरसेवक राहिलेले, माजी नगरसेवक तथा गटनेते आणि विद्यमान शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्या पत्नी सौ. संगीता सोमनाथ गुरव या प्रबळ दावेदार आहेत. खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि आमदार तसेच जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून समजले जात असून त्यांचा गुरव यांना पूर्ण पाठबळ असल्याचे सांगितले जाते.
काँग्रेस पक्षाकडून दोघे सक्षम दावेदार!
काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे हे काँग्रेस पक्षाकडे जागा सोडून घेऊन दावेदारी दाखल करू शकतात. त्याचप्रमाणे काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत यांच्या पत्नी सौ. राधिका धनंजय राऊत यांचे नावही चर्चेत आहे. धनंजय राऊत हे पक्षनिष्ठ, कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ जपणारे आणि संघटनेत सक्रिय भूमिका बजावणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ओबीसी समाजासाठी सतत भरीव काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवतींची दावेदारी अधिक सक्षम आणि जनतेत प्रभावी मानली जात आहे.
तर काँग्रेस पक्षाचे दुसरे दावेदार हे अझर पठाण काँग्रेसचे उदयोन्मुख युवा नेते असून सर्व समाजघटकांमध्ये लोकप्रिय आहेत. मुस्लिम समाजासह इतर घटकांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. अडीअडचणीच्या काळात मदतीला धावून जाणारे, प्रामाणिक व कार्यक्षम नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी सौ. सबा अझर पठाण यांची दावेदारी उभी राहणे ही त्यांच्यावरील जनतेच्या विश्वासाची व समाजातील आपुलकीची साक्ष असल्याचे बोलले जात आहे.
समीकरणे गुंतागुंतीची, निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या सर्व दावेदारांमध्ये ऐनवेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास आप्पा शिंदे ज्यांच्या गळ्यात माळ टाकतील तेच शेवटी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
धाराशिव शहरवासीयांची उत्सुकता शिगेला
धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी आता ओबीसी महिला आरक्षण निश्चित झाल्याने सर्व समीकरणे बदलली आहेत. भाजप, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून जोरदार दावेदार उभे राहिले असून कोणावर शेवटी पक्षश्रेष्ठींचा विश्वास बसतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
“शेवटी धाराशिव चा नगराध्यक्ष कोण?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी येणाऱ्या निवडणुकीत राजकीय रंगत आणि थेट लढत पाहायला मिळणार यात शंका नाही.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












