प्रभाग १२ मध्ये राजकीय भूकंप : अपक्ष प्रकाश अलकुंडे व संदीप सालगर राष्ट्रवादीत…साईनाथ कुऱ्हाडे यांना जाहीर पाठिंबा
धाराशिव (प्रतिनिधी – लोकमदत न्यूज)
धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. प्रभागातील अपक्ष उमेदवार प्रकाश अलकुंडे आणि संदीप सालगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवार साईनाथ कुऱ्हाडे यांना आपला सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे. हा प्रवेश राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.
पक्षप्रवेशानंतर आयोजित केलेल्या कॉर्नर सभेला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून साईनाथ कुऱ्हाडे यांच्या उमेदवारीला समर्थन दर्शविले. या सभेत बोलताना जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रभाग 12 सहित संपूर्ण शहरात बदल घडवण्यासाठी या निवडणुकीत सर्व उमेदवारांना बहुमताने संधी द्यावी असे आवाहन करण्यात आले.”
या सभेदरम्यान साईनाथ कुऱ्हाडे यांनीही प्रभागासाठी विकासाचे भक्कम नियोजन सादर केले. त्यांनी आश्वासन दिले की, प्रभागातील नागरिकांच्या नळाला 24 तास पाणी योजना प्राधान्याने राबवण्यात येईल, रस्ते, नाले व दिवाबत्तीची सोय अधिकाधिक कार्यक्षम केली जाईल, तसेच प्रभागातील नागरिकांसाठी एक भव्य उद्यान उभारले जाईल, ज्याचा लाभ विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांना होणार आहे. याशिवाय प्रभागातील नगरपरिषद शाळेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलत ती अत्याधुनिक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
“माता-भगिनींचा आशिर्वाद घेऊन माझ्या प्रभागासाठी सेवा करण्याची संधी द्या. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी मी सदैव जनतेच्या सेवेत राहीन,” असे भावनिक आवाहन युवा उमेदवार साईनाथ कुऱ्हाडे यांनी उपस्थित नागरिकांना केले.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष खलिफा भाई कुरेशी, शेखर घोडके जिल्हा युवक अध्यक्ष, जयंत देशमुख, अॅड. योगेश सोन्नेपाटील, अमर गुंड, अविनाश जाधव, अमोल सुरवसे, तसेच पक्षाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते. नव्याने पक्षात दाखल झालेल्या दोन्ही नेत्यांचे सर्व मान्यवरांनी स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रवेशामुळे प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मजबूत होणार असून निवडणुकीतील समीकरणेही बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
















