धाराशिव दि.३१ (प्रतिनिधी) – शहरातील गवळी वाडा येथील श्रीकृष्ण गणेश मंडळाच्या…ऑपरेशन सिंदू… या देखाव्याचे उद्घाटन धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या हस्ते दि.३० ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, दैनिक आरंभ मराठीचे संपादक चंद्रसेन देशमुख, दैनिक एकमतचे अभिमान हंगरगेगर, दिशा न्यूजचे संपादक किशोर माळी, दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, के.न्यूजचे संपादक किरण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळाच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंडळाची यशोगाथा व देखाव्याच्या संदर्भातील माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर खो – खो खेळाचे प्रशिक्षक प्रविण बागल यांना २०२४-२५ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल व पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस हवालदार दिपक लाव्हरे-पाटील यांचा तर खो-खो चे प्रशिक्षक प्रभाकर काळे यांचा सत्कार मंडळाच्यावतीने करण्यात आला. तसेच गवळी वाडा परिसरातील इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण झालेले व स्कॉलरशिप, एम.टी.एस, ए.टी.एस. या स्पर्धा परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या २५ गुणवंत विद्यार्थ्यांचा व खेळाडुंचा शालेय साहित्य व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोनि दराडे म्हणाले की, मंडळाच्यावतीने दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जातात. यावर्षी देखील या मंडळाने भारतीय सैन्यांच्या पराक्रम व शौर्याचा..ऑपरेशन सिंदूर…हा देखावा सादर असल्याचे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शालेय व कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी मंडळाने प्रत्येक महिन्याला स्पर्धा परिक्षेचे आयोजन करुन स्पर्धा परिक्षेत मिरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंडळाच्यावतीने गौरव करण्यात यावा. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण होईल व त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षांसाठी होऊ शिकेल असे सांगून मंडळाच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. तर देशमुख म्हणाले की, मंडळाने स्थापनेपासून विविध प्रकारचे सामाजिक देखावे साजरे करुन जनजागृती केली आहे. यावर्षी मंडळाच्यावतीने ऑपरेशन सिंदूर हा देखावा सादर केला असून देखाव्याच्या अनुषंगाने माहिती पुस्तिका तयार केली आहे. हे मंडळ फक्त गणेश उत्सव कालावधीत सामाजिक कार्य न करता वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत असते. त्या कार्याची दखल म्हणून मंडळाला स्थापनेपासून प्रत्येक वर्षी बक्षिसे मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष शितल देशमुख, उपाध्या अभिषेक बागल यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेश गवळी यांनी मानले. यावेळी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.











