वडिलांच्या मदतीला लंडनहून धावला ‘पोरगा’; धाराशिव नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर
धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक असताना प्रचाराला जोरदार उधाण आले आहे. येत्या 2 डिसेंबरला मतदान होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) पक्षाला बळ देण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांचे सुपुत्र करण प्रतापसिंह पाटील लंडनहून थेट धाराशिवात दाखल झाले आहेत.
शहरातील विविध प्रभागांमध्ये भेटी देत त्यांनी उमेदवारांशी संवाद साधला आणि मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. पक्षासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे यावर भर देताना त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
“उरलेले दोन दिवस तुम्ही डोळ्यात तेल घालून मेहनत घेतली, तर पुढील पाच वर्षे निश्चितपणे चांगले परिणाम दिसतील,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जित केले.
करण पाटील यांनी विशेषतः प्रभाग क्रमांक 12 ब चे उमेदवार साईनाथ कुऱ्हाडे,प्रभाग क्रमांक 20 अ चे उमेदवार निलेश राम साळुंके यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी आयोजित कॉर्नर सभांना संबोधित केले.
यावेळी त्यांनी, “प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही,” असे आश्वासन देत पक्षाच्या विजयासाठी सर्वांनी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.












