स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा द्या – शहर काँग्रेसची पालकमंत्र्याकडे ठाम मागणी
धाराशिव दी.१७(प्रतिनिधी):धाराशिव-उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयात वाढत्या रुग्णभारामुळे सध्याची जागा अपुरी ठरत असून दररोज जिल्हाभरातून असंख्य गरोदर महिला प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल होत असतात. मात्र मर्यादित जागेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसने स्त्री रुग्णालयाला शेजारील जागा हस्तांतरित करून वाढीव सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राज्याचे परिवहन व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पालकमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी मांडली. यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले की, रुग्णालयातील खाटांची संख्या अपुरी असल्याने अनेक गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व काळात कॉरिडॉरमध्ये किंवा जमिनीवर बसून थांबावे लागते. काही वेळा रुग्णालयात बेड मिळत नसल्याने महिलांना खाजगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारावा लागतो. यामुळे गरीब कुटुंबीयांवर अतिरिक्त आर्थिक ओझे पडत असून, त्यांच्या आयुष्याचा प्रश्नच निर्माण होत आहे.
शिष्टमंडळाने सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तातडीची उपचारसुविधा उपलब्ध नसते. जागेअभावी शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या आवश्यक कक्षांची कमतरता आहे. यामुळे अनेक वेळा रुग्णांना धोका निर्माण होतो. अशा गंभीर परिस्थितीत तातडीने रुग्णालयासाठी शेजारील जागा हस्तांतरित करणे अत्यावश्यक असल्याचे मत काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सरनाईक यांच्यासमोर मांडले.
या भेटीप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, युवा नेते अझर पठाण, महादेव पेठे, संजय गजधने आदी उपस्थित होते.
शहर काँग्रेस शिष्टमंडळाने सांगितले की, महिलांच्या आरोग्याशी निगडित हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












