उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाराशिव दौरा
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा – “कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही”
धाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी)
धाराशिव जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातील चिंचोली, गोरमळा आणि वालवड या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतपिकांसह घरांचे झालेले नुकसान त्यांनी जागेवर जाऊन पाहिले.
वालवड येथील साठवण तलाव व आजूबाजूच्या शेतीची पाहणी करून तातडीने आवश्यक ती मदत पोहोचवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात शासन ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील, याची ग्वाही देताना अजित पवार म्हणाले की, “मदतकार्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. शासनाची जबाबदारी आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत दिलासा पोहोचवावा, आणि त्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून आहे.”
पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा शांतपणे ऐकून घेतली व तातडीने पंचनामे पूर्ण करून आर्थिक सहाय्य वितरित करण्याचे आदेश दिले. यावेळी स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786














