तृतीय पंथी यांच्यासाठी घरकुल बांधून देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) – शहरातील तृतीय पंथी यांच्यासाठी घरकुल बांधून देण्यात यावे. तसेच तृतीय पंचांच्या स्मशानभूमीचा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.१२ जानेवारी रोजी देवांशी उर्फ रुक्मिण प्रकाश काकडे यांनी
केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि. १४ जुलै २०२३ रोजी धाराशिव येथील सेवानिवृत्त पोलिस अंमलदार लाडप्पा अण्णाराव चिक्काळे या दानशूराने तृतीय पंथी यांना शासनाने घरे बांधून द्यावीत. तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवावी या एकमेव चांगल्या उद्देशाने त्यांच्या सेवावृतीच्या पैशातून धाराशिव तालुक्यातील आळणी शिवारात सर्वे नं. १२८, गट नं. ३१९ मध्ये घेतलेल्या ०.९३ गुंठे जमीनीपैकी ०.३३ गुंठे जमीन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या सुचनेनुसार ग्रामपंचायत आळणी तसेच ग्रामसेवक आळणी यांच्या नावाने दान केली. ती जमीन दान देण्यासाठी लागलेला रजिस्टीचा खर्च देखील लाडप्पा अण्णाराव चिक्काळे यांनीच केला. या रजिस्ट्रीच्या वेळी धाराशिवचे तत्कालीन तहसिलदार शिवानंद बिडवे यांनी स्वतः जातीने हजर होते. या रजिस्ट्रेशन नंतर आजतागायत चिक्काळे हे घरकुल लवकर होण्यासाठी पाठपुरावा करत असून आम्हीपण देखील करत आहोत. तसेच आज घडीला ती जमीन आळणी ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या नावे होऊन दोन वर्षे झालेली आहेत. मात्र त्या जमीनीवर तृतीय पंथीयांसाठी ना घरकुल झाले ना कोणती कल्याणकारी योजना राबविण्यात आली. तसेच शासनाकडून कोणतीही सहाय्यता मिळत नाही.
दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा केली होती. विशेष म्हणजे त्याची एक प्रत आवक जावकला देखील जमा केली असून अद्यापपर्यंत देखील त्या संदर्भात त्या कामाची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे तृतीय पंथ यांच्यावतीने घरकुल बांधून देण्याची व इतर योजना राबविण्याची अंतःकरणातून विनंती करत आहोत. तृतीय पंथी यांच्या घरकुलासाठी व इतर कल्याणकारी योजनांसाठी चिक्काळे यांनी दान दिलेल्या दिलेल्या ०.३३ गुंठे जमीनीवर लवकरात लवकर घरकूल बांधून द्यावेत. त्यामुळे सध्याच्या महागाईच्या काळात तृतीय पंथी यांची होत असलेली कुचंबणा, हाल थांबून त्यांचे जीवन थोडतरी सुखमय होईल, अशी अपेक्षा देवांशी रुक्मिण प्रकाश काकडे यांनी केली आहे.












