धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद आरक्षण सोमवारी ठरणार!– राजकीय पक्षांसह शहरवासी उत्सुकता शिगेला
राज्यातील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणासाठी ६ ऑक्टोबरला सोडत
मुंबई दि. ४ (अमजद सय्यद) :महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठीची सोडत जाहीर केली आहे. ही सोडत येत्या सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयातील ६ वा मजला, परिषद सभागृह, मुंबई येथे पार पडणार आहे.
राज्यातील २४५ नगरपरिषद आणि १३४ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण सोडत काढण्यात येत आहे. या सोडतीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाचा आराखडा स्पष्ट होणार आहे.
नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयीन प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सोडतीच्या प्रक्रियेत उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक पक्षातील फक्त दोन प्रतिनिधींनाच आमंत्रण देण्यात आले आहे. संबंधित पक्षांचे अध्यक्ष अथवा सचिव यांनी आपल्या दोन प्रतिनिधींची नावे शासनाकडे शिफारस करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या काळात अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी करूनही त्यांचा हिरमोड झाला होता. मात्र आता शासनाने निवडणुकीच्या हालचालींना गती दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद हे मागील निवडणुकीत सर्वसाधारण पुरुषांसाठी आरक्षित होते. त्यानंतर दीर्घकाळ निवडणुका न झाल्याने येथे प्रशासन राजवट सुरू आहे. त्यामुळे यावेळी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबत उत्सुकता अधिक आहे. धाराशिव ही जिल्ह्यातील सर्वात मोठी “अ” दर्जाची आणि जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी नगरपालिका असल्याने सर्व राजकीय पक्षांचे डोळे यावर खिळले आहेत.
सोमवारी होणाऱ्या या सोडतीनंतर धाराशिव शहरासह जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून, राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












