धाराशिव पुरस्थितीचा आढावा; मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाण्यात उतरून पाहणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर चर्चेत
धाराशिव दि.२४ (अमजद सय्यद):धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे भूम, परांडा,वाशी तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन उध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर या स्वतः नागरिकांच्या परिस्थितीची जाण घेण्यासाठी उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे, पाहणीदरम्यान जेव्हा मंत्री महाजन यांनी गुडघ्याच्या वर असलेल्या पाण्यातून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला, त्याच वेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनीही पाण्यात उतरून त्यांच्यासोबत ग्रामस्थांच्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाच्या जबाबदाऱ्या (कायदा व सुव्यवस्था) पार पाडताना नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी दाखविलेली ही तत्परता आणि खंबीर साथ नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
पूरग्रस्त भागात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे मंत्री महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये विश्वास आणि दिलासा निर्माण झाला आहे. केवळ नेतेच नव्हे तर प्रशासनही नागरिकांच्या मदतीसाठी थेट मैदानात उतरले आहे, याचे जिवंत उदाहरण पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या कार्यशैलीतून दिसून आले.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, तातडीने मदतकार्य सुरु करणे आणि पुनर्वसन प्रक्रियेत प्रशासनाची सक्रिय भूमिका यामुळे धाराशिवकरांमध्ये एक आश्वासक संदेश पोहोचला आहे. आपत्तीसमयी गुडघाभर पाण्यात उतरून परिस्थितीचा थेट आढावा घेणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786















