पानटपरीवाल्याची मुलगी सबा शेख झाली सनदी लेखापाल – आमदार कैलास पाटील यांनी केला सत्कार
धाराशिव : शहरातील समता नगर येथील सबा रियाजोद्दीन शेख हिने सनदी लेखापाल (CA) परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून धाराशिव शहराचं नाव उज्ज्वल केलं आहे. सबाच्या या प्रेरणादायी यशाबद्दल आमदार कैलास पाटील यांनी तिचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले.
सर्व साधारण परिस्थितीत वाढलेल्या सबा शेखच्या या यशामागे तिच्या पालकांच्या कष्टांचं मोठं योगदान आहे. सबाच्या वडिलांनी पान टपरी चालवून आपल्या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं. वडिलांच्या संघर्षाची जाणीव ठेवून सबा हिने शिक्षणासोबतच शहरातील प्रसिद्ध सनदी लेखापाल दीपक भातभागे यांच्या कार्यालयात काम करत अथक परिश्रम घेतले आणि हे उल्लेखनीय यश संपादन केले.
या प्रसंगी आमदार कैलास पाटील म्हणाले, “सबा शेख हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर CA सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून धाराशिवचं नाव उज्वल केलं आहे. तिचा हा यशप्रवास अनेक तरुण-तरुणींना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”
सबा शेखच्या पुढील वाटचालीसाठी आमदार कैलास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या असून, या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) धाराशिव-कळंब विधानसभा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष शौकत भाई शेख, शिवसेना उपतालुका प्रमुख गफूर भाई शेख, साबीर सय्यद, छोटा साजिद सय्यद, अलीम पेंटर, मुजीब काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
सबा शेखचा हा यशप्रवास धाराशिवसह संपूर्ण जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत असून, तिच्या मेहनतीला सर्व स्तरांतून दाद मिळत आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












