शिवसेना उबाठा गटाला धाराशिवमध्ये दोन दिवसांत दुसरा मोठा हाबाडा उपतालुका प्रमुख गफूर शेख यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
धाराशिव, (प्रतिनिधी):शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला धाराशिवमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून उपतालुका प्रमुख तसेच सांजा गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य गफूरभाई शेख यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे गफूर शेख यांनी यापूर्वी धाराशिव नगरपालिकेतील अनेक प्रभागांमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून काम केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसमोरच हा पक्षप्रवेश झाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे सांजा जिल्हा परिषद गटातून विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील हे २०१६ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्याच मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी असलेल्या गफूर शेख यांनी शिवसेना उबाठा गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने उबाठा गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यामुळे संबंधित सांजा गटामध्ये भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गफूर शेख पक्षांतर्गत नाराज असल्याचे समोर येत होते. त्यांनी ही नाराजी नेतृत्वाकडे व्यक्त केली होती व वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका होऊन ती दूर करण्याचे प्रयत्नही झाले होते. मात्र निवडणूक जाहीर होताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या पक्ष प्रवेशप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा नेते सतीश धननाईक, नितीन (बाप्पा) शेरखाने, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा धाराशिव शहराध्यक्ष फरमान काझी, सांजा गावचे माजी सरपंच श्रीराम बापू सूर्यवंशी, मालोजी सूर्यवंशी, आशिष नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दररोज शिवसेना उबाठा गटातून पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र असून, आता तरी उबाठा गटातील नेतृत्वाने आत्मपरीक्षण करून कार्यकर्त्यांना न्याय व ताकद देण्याचे काम करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












