जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या बैठका संपन्न – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
कानेगाव, जेवळी, सास्तूर व माकणी येथे जिल्हा परिषद गट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आढावा बैठका उत्साहात संपन्न आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ता. लोहारा येथील सास्तूर, जेवळी, कानेगाव व माकणी या जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सखोल आढावा बैठका संपन्न झाल्या. या सर्व बैठका माझ्यासह आमदार श्री. प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
या बैठकीदरम्यान संबंधित गटांतील आजवर झालेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात हाती घ्यावयाच्या स्थानिक विकासकामांचे नियोजन, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, बूथस्तरावर कार्यकर्त्यांची प्रभावी नियुक्ती, मतदारांशी थेट संपर्क वाढविणे, नागरिकांच्या मूलभूत समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ राजकीय लढत नसून जनतेच्या विश्वासाची आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा प्रतिनिधी असून जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहणे, विकासाची स्पष्ट व ठोस भूमिका मांडणे आणि पक्षाची धोरणे घराघरात पोहोचवणे हीच यशस्वी निवडणुकीची खरी गुरुकिल्ली आहे.
संघटनेत कोणताही मतभेद न ठेवता सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी एकदिलाने, एकजुटीने व शिस्तबद्ध पद्धतीने कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर, जनतेच्या विश्वासावर आणि संघटनाच्या बळावर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये यश निश्चित असल्याचा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून शेतकरी, युवक, महिला, कामगार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आघाडी सातत्याने लढत राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले या बैठकीस सास्तूर, जेवळी, कानेगाव व माकणी जिल्हा परिषद गटांतील पदाधिकारी, माजी पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












