शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’…माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर व जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी : लोकमदत न्यूज): धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दीर्घकाळ सक्रिय राहिलेले शहराचे माजी नगराध्यक्ष दत्ता आप्पा बंडगर आणि विद्यमान जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत पक्षप्रवेश केला. शेकडो समर्थकांसह झालेल्या या प्रवेशामुळे शहरातील आगामी निवडणुकीच्या गणितात मोठा बदल घडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपच्या मुख्य कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते बंडगर यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. या वेळी घोषणांच्या गजरात, जल्लोषाच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. बंडगर यांनी भाजपच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर, पक्षाच्या भक्कम संघटनशक्तीवर आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या दूरदृष्टीवर विश्वास दाखवत पक्षप्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. शहरातील मोठे समाजकार्यकर्ते आणि संघटन असलेल्या बंडगर कुटुंबाच्या समर्थकांमुळे भाजपला धाराशिवमध्ये नवे बळ मिळणार असल्याचे राजकीय परीक्षकांचे मत आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत बंडगर परिवाराचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने नगरपरिषदेच्या निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील काही प्रभागातील उमेदवारी, प्रचार मोहीम आणि मतविभाजनावर या घडामोडीचा निर्णायक प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, नितीन भोसले, चंद्रजीत जाधव, सुनील काकडे, अभय इंगळे, विलास लोंढे, नितीन शेरखाने तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उत्साह, जल्लोष आणि घोषणांच्या वातावरणात पार पडलेल्या या समारंभाने धाराशिवच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण केले असून, आगामी निवडणुकीत भाजपसाठी ही ‘विजयी चाल’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद“
संपादक अमजद सय्यद 8390088786












