धाराशिव नगर परिषदेत शिवसेनेचा नवा डाव – आक्रमक व अभ्यासू नगरसेवक प्रदीप मुंढे गटनेता पदावर नियुक्त
धाराशिव दि.१५(प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राजकीय रणनितीत आखत मोठा आणि निर्णायक डाव टाकत आक्रमक, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळख असलेले नगरसेवक प्रदीप मुंढे यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे. या निवडीमुळे नगर परिषदेच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून या निवडीमुळे मात्र सत्ताधाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ उडणार आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे प्रदीप मुंढे हे नगर परिषदेतील प्रत्येक विषयावर सखोल अभ्यास करून आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. सत्ताधाऱ्यांना “पळू का सळू करून सोडणारे” अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या मुंढेंकडे आता अधिकृतपणे शिवसेना पक्षाचे गटनेता (नेतृत्व) सोपवण्यात आल्याने नगर परिषदेत लढतीचे राजकारण पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून नगर परिषदेतील अनेक प्रश्नांवर मुंढे यांनी प्रशासनाला जाब विचारत जनतेच्या समस्या सभागृहात मांडल्या आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण, करआकारणी, नागरी सुविधांचा अभाव यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी सभागृहामध्ये आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची ही निवड म्हणजे शिवसेनेचा स्पष्ट संदेश असून आगामी काळात नगर परिषदेत आक्रमक विरोधाची भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या निवडीबाबत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी मुंढेंचे अभिनंदन केले आहे. अनेकांनी ही निवड म्हणजे धाराशिवच्या राजकारणात बदलाची नांदी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
प्रदीप मुंढे यांची पक्षश्रेष्ठीने गटनेतेपदि निवड केल्यानंतर सांगितले की, “शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी सभागृहात निर्भीडपणे आवाज उठवणार आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन.”
या निवडीमुळे आगामी नगर परिषद सभांमध्ये अधिक तापलेले वातावरण पाहायला मिळणार असून धाराशिवच्या राजकारणात शिवसेनेचा हा नवा डाव निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












