श्रीकृष्ण गणेश मंडळ गवळी वाडा, धाराशिव यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान
धाराशिव दि. २६ (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील प्रतिष्ठित श्रीकृष्ण गणेश मंडळ, गवळी वाडा यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजिलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
सन १९९२ मध्ये स्थापनेपासून श्रीकृष्ण गणेश मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत विविध विधायक उपक्रमांच्या माध्यमातून शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करून समाजप्रबोधनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या या मंडळाने वर्षभरातही विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आतापर्यंत मंडळास जिल्हा पोलीस दल, रोटरी क्लब व जिल्हा पत्रकासंघ आदी संस्थांकडून मिळून तब्बल ३५ पारितोषिके मिळाली असून, २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धेत धाराशिव तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवून मानाचा ठसा उमटविला होता.
या वर्षी आयोजित स्पर्धेत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय असे तीन स्तरांवर पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवण्याचा मान श्रीकृष्ण गणेश मंडळाने मिळवला.
सदर पारितोषिक वितरण सोहळा दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पारितोषिकाचे वितरण सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अनिल देसाई व आमदार महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष म्हणून शीतल देशमुख यांनी हा मानाचा बहुमान स्विकारला.
श्रीकृष्ण गणेश मंडळाच्या या यशामुळे धाराशिव शहरात अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. इतर गणेश मंडळांनी देखील श्रीकृष्ण गणेश मंडळाचा आदर्श घेऊन सामाजिक उपक्रमांना चालना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी तत्काळ संपर्क साधावा… संपादक अमजद सय्यद 8390088786













