श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटींचा दिलासा, महिलांना एक हजार साड्यांचे वाटप
धाराशिव दि.२७ (अमजद सय्यद):राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण काळात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तातडीने मदतीला धावून आले आहे. पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांसाठी मंदिर संस्थानच्या वतीने एक हजार साड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून गरजेनुसार इतर मदतसुद्धा वेळोवेळी पुरविली जात आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजा स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून मदतकार्याचा आढावा घेत आहेत.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे भाविकांच्या देणगीतून चालत असून समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले आहे. याआधी कोल्हापूर व पुण्यातील महापुराच्या काळातसुद्धा संस्थानने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच महिलांना साड्यांचे वाटप केले होते. २०१९ मध्ये संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांची मदत दिली होती.
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, पिकांचे प्रचंड नुकसान झाले, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, जनावरे वाहून गेली. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थान धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात राहून मदत कार्य सुरू ठेवणार आहे.
श्री तुळजाभवानी देवींच्या भक्तांशी असलेले भावनिक नाते जपत मंदिर संस्थान नेहमीच समाजासाठी तत्पर राहिले आहे. पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आधार देणे हीच संस्थानची परंपरा असून आजही तुळजाभवानी मंदिर संस्थान ठामपणे पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













