श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 : तुळजापूरात वाहतुकीत बदल
तुळजापूर (प्रतिनिधी) – श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 दिनांक 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यावेळी कोजागिरी पौर्णिमा (6 ऑक्टोबर) व मंदिर पौर्णिमा (7 ऑक्टोबर) निमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातून लाखो भाविक पायी तुळजापूरला दाखल होतात. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर यांच्या अहवालावरून जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) व पोलीस अधीक्षक रितु खोखर (भा.पो.से.) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1)(ब) अन्वये हा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री 00:01 वा. ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 24:00 वा. दरम्यान तुळजापूर मार्गे होणाऱ्या काही महत्त्वाच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर–हैद्राबाद, हैद्राबाद–छत्रपती संभाजीनगर, लातूर–सोलापूर, सोलापूर–लातूर, छत्रपती संभाजीनगर–सोलापूर, सोलापूर–छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर–बार्शी व बार्शी–तुळजापूर या मार्गांवरून जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर–हैद्राबाद वाहतूक बीड–अंबाजोगाई–लातूर–औसा–उमरगा मार्गे किंवा बीड–येडशी–मुरुड–लातूर–औसा–उमरगा मार्गे जाईल. हैद्राबाद–छत्रपती संभाजीनगर वाहतूक उमरगा–औसा–लातूर–अंबाजोगाई–बीड किंवा उमरगा–लातूर–मुरुड–येडशी–बीड मार्गे वळविण्यात येईल.
धाराशिव–सोलापूर वाहतूक वैरागमार्गे होईल, तर लातूर–सोलापूर वाहतूक मुरुड–ढोकी–येडशी–बार्शीमार्गे होणार आहे. छत्रपती संभाजीनगर–सोलापूर वाहतूक येरमाळा–बार्शीमार्गे वळवली जाईल. तुळजापूर–बार्शी वाहतूक धाराशिवमार्गे आणि बार्शी–तुळजापूर वाहतूक वैराग–धाराशिवमार्गे होणार आहे. तसेच तुळजापूर–सोलापूर वाहतूक मंगरुळ पाटी–इटकळ–बोरामणी मार्गे, तर सोलापूर–तुळजापूर वाहतूक बोरामणी–इटकळ–मंगरुळ पाटीमार्गे वळविण्यात येणार आहे.
ही बंदी पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवा व एस.टी. बसेस यांना लागू राहणार नाही.
जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व नागरिकांच्या सोयीसाठी हे बदल केले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












