शिवसेना युवती जिल्हाप्रमुखपदी श्वेता दुरुगकर यांची निवड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दाखवला विश्वास – सक्रिय कार्यकर्तीला मिळाली मोठी जबाबदारी
धाराशिव – (प्रतिनिधी)धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या चार तालुक्यांचा समावेश असलेल्या युवती जिल्हाप्रमुखपदी श्वेता सागर दुरुगकर यांची निवड युवासेना प्रमुख माजी मंत्री आ. आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सोडून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या राजकीय कार्याची आणि संघटन कौशल्याची दखल घेत दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या अधिकृत मुखपत्रातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात असताना श्वेता दुरुगकर या युवती काँग्रेस जिल्हाप्रमुख या पदावर कार्यरत होत्या. पक्षातील सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेश सोहळ्याला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे उपस्थित होत्या.
श्वेता दुरुगकर यांच्या सक्रिय राजकीय कार्यामुळे, संघटन कौशल्यामुळे आणि युवतीतील समन्वय क्षमतेमुळे त्यांच्यावर विश्वास दाखवत पक्षाने त्यांना युवती जिल्हाप्रमुखपदी नेमले आहे. त्यांच्या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यातील युवतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेनेच्या संघटन कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
श्वेता दुरुगकर यांच्या निवडीचे जिल्हाभरातून स्वागत व कौतुकाच वर्षाव होत असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा फायदा शिवसेनेला होईल, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
शिवसेनेत प्रवेशानंतर थोड्याच काळात जिल्हास्तरीय महत्त्वाच्या पदावर निवड होणे हे श्वेता दुरुगकर यांच्या प्रभावी नेतृत्वाचे द्योतक मानले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे महिला कार्यकर्त्यांनाही प्रेरणा मिळाली असून, युवतीच्या संघटनाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संपादक अमजद सय्यद 8390088786













