लोहारा (जि. धाराशिव) : घरगुती वादातून थरारक प्रकार घडला आहे. मुलाने स्वतःच्या पत्नीसह मिळून आईचा खून केल्याची धक्कादायक घटना लोहारा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास लोहारा येथील उमाबाई सुरेश रणशुर (वय ५५) यांना त्यांच्या मुलगा सौदागर सुरेश रणशुर व त्याची पत्नी पूजा सौदागर रणशुर यांनी घरगुती भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या झटापटीत उमाबाई रणशुर यांचा जागीच मृत्यू झाला. नंतर या आरोपींनी बनाव रचत उमाबाईंनी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती महेश सुरेश रणशुर (रा. लोहारा, सध्या शिवहरी ग्रीन सिटी, वापी, जि. वलसाड, गुजरात) याला मिळताच त्याने लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
त्यानुसार पोलिसांनी सौदागर रणशुर व पूजा रणशुर या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ (खून), ३५२ (मारहाण), तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास लोहारा पोलिसांकडून सुरू असून, या हत्याकांडाने लोहारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.












