तुळजापूरमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वाहतूक व बंदोबस्ताची पाहणी
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची तुळजाभवानी मंदिर परिसरासह वाहतूक व्यवस्थेची पाहणी
तुळजापूर दि. ०६ (प्रतिनिधी) :
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापुरात होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी तुळजाभवानी मंदिर परिसरासह शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून वाहतूक व्यवस्थेचा तसेच बंदोबस्ताचा आढावा घेतला.
यावेळी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता, नियंत्रण कक्षातील यंत्रणा, पार्किंगची सोय, प्रवेश-निर्गमन रस्त्यावरील पोलीस तैनाती आणि वाहतूक नियोजनाची माहिती घेतली. गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही महत्त्वाच्या ठिकाणी नेमण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक खोखर यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले की, भाविकांची गैरसोय होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जावे. गर्दीच्या वेळी आपत्कालीन आराखडा तयार ठेवण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क राहून नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.













