एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दिशेने पाऊल; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – प्रताप सरनाईक परिवहन मंत्री
मुंबई | लोकमदत न्यूज
राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी.) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आज विधानभवन येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले.
या बैठकीत एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बैठकीदरम्यान एस.टी. महामंडळात कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी संघाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, एस.टी. कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हीच महामंडळाची भूमिका आहे. कर्मचारी संघटनांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्यात येईल. यामुळे सामान्य प्रवाशांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल.
तसेच एस.टी. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सामोपचाराने तोडगा काढावा, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. विधानभवनातील दालनात झालेल्या या बैठकीत एस.टी. महामंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक, प्रवासी व कर्मचारी हिताचे करण्यावर विशेष भर देण्यात आला.
दरम्यान, एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देशही एस.टी. प्रशासनाला देण्यात आले. या संदर्भात कर्मचारी संघटनांच्या भावना तीव्र असल्याने या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786













