पवनचक्की उभारणीतील ‘मध्यस्थां’चा सुळसुळाट थांबवा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश
शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, दलालांवर ‘सुओ मोटो’ गुन्हे दाखल करा – मंत्रालयातील महत्त्वाच्या बैठकीत स्पष्ट निर्देश
धाराशिव (प्रतिनिधी):जिल्ह्यात पवनचक्की उभारणीचा उद्योग झपाट्याने वाढत असून या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात येत आहेत. परंतु त्यांना योग्य मोबदला मिळावा आणि ‘मध्यस्थां’च्या दलालीपासून त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कठोर भूमिका घेत पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.
मंत्रालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या महत्त्वाच्या बैठकीस धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा, जिल्हा पोलीस अधीक्षक शफखत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तसेच पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना सरनाईक म्हणाले, “पवनचक्की उभारणीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्यामुळे त्यांना कंपनीकडून योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. शासन या प्रक्रियेत समन्वयकाची भूमिका निभावेल; परंतु दलालांच्या सुळसुळाटामुळे अनेक शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी गुंडगिरी आणि धमक्यांच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. अशा गुंडांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तक्रारीची वाट न पाहता सुओ मोटो गुन्हे दाखल करावेत,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
पालकमंत्र्यांनी पुढे सांगितले की, जिल्हा प्रशासनाने पवनचक्की उद्योग उभारणीसाठी संबंधित कंपन्यांना आवश्यक सहकार्य द्यावे, मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पवनचक्की उद्योगाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल, पण या विकासात शेतकऱ्यांचे हित जपले जावे हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत पवनचक्की उभारणीसाठी जमीन हस्तांतरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबाबत आणि सर्व व्यवहार शासनाच्या देखरेखीखाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786














