धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी):”सत्ताधारी कितीही गर्विष्ठ असले तरी जनमताच्या रेट्यापुढे त्यांना झुकावेच लागेल,” अशा शब्दांत आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथे त्यांनी नागरिकांची भेट घेऊन अडचणी व मागण्या जाणून घेतल्या.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घाम गाळून उभे केलेले पिक पाण्यात वाहून गेले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. “आयुष्याचं सोने आज चिखलाखाली गाडलं गेलं आहे,” अशा शब्दांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वेदना व्यक्त केल्या.
राज्य सरकार फक्त पंचनाम्याच्या घोषणांवर समाधानी असल्याचा आरोप त्यांनी केला. “फक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे,” अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आश्वासन दिले की, “मी स्वतः शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणार आहे. ही मागणी मान्य व्हावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे.”
या भेटीदरम्यान शेतकरी व गावकरी यांनी आपल्या अडचणी व मागण्या आमदारांसमोर मांडल्या. गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या वेदना ऐकून आमदारांनी त्यांना धीर देत त्वरित मदतीसाठी आवाज उठवला.
शेतकऱ्यांचे दु:ख आणि नुकसान लक्षात घेता सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जनमताचा रेटा त्यांना झुकवेल, असा इशारा आमदार कैलास पाटील यांनी शासनाला दिला.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












