धाराशिवच्या अवैध कला केंद्रांचा झिंगाट कारभार पुन्हा उघड – “पालकमंत्र्यांच्या आदेशाची प्रशासनाकडून उघड पायमल्ली!”
प्रशासनाची ढिलाई की हेतुपुरस्सर दुर्लक्ष? अवैध कला केंद्रांत “छमछम” सुरूच!
धाराशिव दि. १० (प्रतिनिधी): साई कला केंद्राशी संबंधित नर्तिकेच्या प्रेम संबंधातून रुई ढोकी येथील तरुणाने केलेल्या आत्महत्येच्या धक्कादायक प्रकरणानंतर धाराशिव जिल्ह्यातील अवैध कला केंद्रांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेने अवैध धंदे, पोलीस-प्रशासनाचे दुर्लक्ष आणि मागील दाराने सुरू असलेल्या कला केंद्रांच्या (छमछम) कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काही महिन्यांपूर्वी तुळजापूरच्या पावन भूमीत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला कडक शब्दांत बजावले होते की,
“अवैध कला केंद्रे तात्काळ बंद केली नाहीत तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
यांच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस विभागाने संयुक्त तपासणी करून तुळजाई, गौरी, साई, महाकाली, पिंजरा आणि कालिका ही सहा कला केंद्रे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र या कारवाईची अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे वास्तव आता समोर आले आहे.
“लोकमदत” मध्ये वेळोवेळी अनियमितता, बेकायदेशीर संबंधांचे प्रकार आणि 24 तास सुरू असलेले कला केंद्र याबाबत व्रत प्रसारित करीत प्रशासनास सतर्क केले होते. काही केंद्रे काही दिवसांसाठी बंदही झाली, पण अल्पावधीतच मागील दरवाजाने पुन्हा सुरू झाल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले. प्रशासनाकडून या गोष्टींकडे जाणीवपूर्वक काना-डोळा केल्याची चर्चा जनतेत आहे.
काल झालेल्या अश्रुब कांबळे यांनी साई कला केंद्र शी संबंधित असलेल्या नर्तिकेशी असलेल्या प्रेमसंबंधातून केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यातील कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत,
संबंधित घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होतो आहे की पालकमंत्र्यांचे आदेश प्रत्यक्षात पाळले जात आहेत का? की खालच्या स्तरावर त्यांची उघड पायमल्ली होत आहे?
या प्रकरणी आता पालकमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करून, अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. जिल्ह्याचे प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि अवैध धंद्यांविरुद्ध कडक भूमिका घेणाऱ्या पोलीस अधीक्षक रितु खोकर यांनीही कला केंद्र कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात, संबंधित बीट आमलदार कोण आहेत, याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांतून करण्यात येत आहे.
मात्र आतातरी अवैध कला केंद्रांवर कायमचा शिक्का बसणार का? की काही दिवस शांततेनंतर पुन्हा तेच ‘राजरोस’ धंदे सुरू होणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












