धाराशिव बसस्थानकाचा स्ट्रक्चरल घोटाळा उघड! — चुकीच्या रचनेमुळेच सिलिंग कोसळले, १० कोटींचे काम धोक्यात; नागरिकांचा संताप उसळला
धाराशिवच्या नवीन बसस्थानकातील विश्रांती कक्षाचे सिलिंग मध्यरात्री कोसळले; चालक-वाहक थोडक्यात बचावले
१० कोटींच्या कामात एवढ्या लवकर सिलिंग कोसळणे म्हणजे भ्रष्टाचाराचा परिणाम — नागरिकांचा संताप
धाराशिव दि.११.(अमजद सय्यद):धाराशिव शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती बस स्थानकात आज पहाटे मोठी दुर्घटना टळली. चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षातील पीव्हीसी पॅनल सिलिंग पहाटे सुमारे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र, ही घटना टळली नसती तर मोठा जीवितसंहार झाला असता.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांती कक्षात मध्यरात्री ३० ते ४० चालक-वाहक मुक्कामाला होते. रात्री कक्षात पाणी गळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन झोप घेतली. काही वेळातच वरचा सिलिंग भाग कोसळला. त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेमुळे कर्मचाऱ्यांची धांदल उडाली यावेळी कर्मचाऱ्यांचा जीव थोडक्यात वाचला.
या घटनेनंतर बसस्थानकात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, हे बसस्थानक सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तब्बल १० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे बसस्थानक अद्याप पूर्ण झालेले नाही. तरीदेखील १ मे रोजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर पाच महिने उलटले असतानाही कामातील त्रुटी, पाणी गळती, आणि दर्जाहीन साहित्याच्या वापराच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.
“१० कोटींच्या कामात एवढ्या लवकर सिलिंग कोसळणे म्हणजे थेट भ्रष्टाचाराचा परिणाम”, असा आरोप प्रवाशांसह स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी जोर धरत आहे.
बसस्थानकाच्या उद्घाटना नंतर पालकमंत्री सरनाईक यांनी “हे माझं दुर्भाग्य समजतो,” अशी वक्तव्ये केली होती, ज्यावर आज पुन्हा चर्चा रंगली आहे. पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केल्यास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र अद्याप त्या चौकशीचे काय झाले, कोण दोषी आहे, यावर पडदा पडलेला नाही.
बसस्थानकाच्या स्ट्रक्चरल डिझाइनमध्येच मोठ्या त्रुटी असल्याचे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळेच अकाउंट सेक्शन आणि कॅश विभाग अद्याप जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीतूनच कार्यरत आहेत. नवीन इमारतीत योग्य जागा आणि सुरक्षेची कमतरता असल्याने स्थलांतर शक्य झालेले नाही.
नागरिकांचा प्रश्न आहे — “अपूर्ण बसस्थानकाचे उद्घाटन करण्याचा एवढा हट्ट पालकमंत्र्यांनी का धरला? काम अपूर्ण असतानाही उद्घाटन करून जीव धोक्यात घालणाऱ्या या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार?”
राजकीय स्तरावर मात्र या प्रकरणाकडे संपूर्ण मौन पाळण्यात येत आहे. सत्ताधारी असो वा विरोधक — दोघांनीही बसस्थानकातील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि धोकेदायक रचना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा आरोप नागरिक करत आहेत.
बसस्थानकाच्या उद्घाटनावेळी हातात फित घेऊन फोटो काढणारे नेते आज मात्र त्या सिलिंगखाली उभे राहायला तयार नाहीत, असा उपरोधिक टोला नागरिकांकडून मारला जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786














