मल्हार पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती करून धाराशिव शहरातील विसर्जन मिरवणुकीस सुरुवात
१ लाख ६० हजार रुपयांच्या बक्षिसांसह भाजपकडून स्पर्धेचे आयोजन
धाराशिव दि.०६(प्रतिनिधी):अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने धाराशिव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला जल्लोषपूर्ण सुरुवात झाली. बार्शी नाका तांबरी विभागातील शिवगर्जना तरुण गणेश मंडळ व विजयनाना दंडनाईक युवा मंच आयोजित मऱ्हाठेशाही ढोल ताशा पथकाच्या गजरात शहरातील विविध गणेश मंडळांना मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेटी देत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
मिरवणुकीची सुरुवात मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते ‘श्रींची’ आरती करून करण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात, गुलालाच्या उधळणीत आणि भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यंदा भारतीय जनता पार्टी, धाराशिवच्या वतीने शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून तब्बल १ लाख ६० हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. धाराशिव शहरातील सर्व गणेश मंडळांनी शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने सादरीकरण करून या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मल्हार पाटील यांनी केले.
या मिरवणुकीत अमित शिंदे, रोहितराज निंबाळकर यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, तसेच हजारो गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.













