‘लोकमदत न्यूज’च्या बातमीचा परिणाम! बांधकाम कामगार योजनांतील दलालीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आवाज
दलालांचे ‘अर्धे तुम्ही-अर्धे आम्ही’ धोरण उघड; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी व कठोर कारवाईची मागणी
धाराशिव | लोकमदत न्यूज
बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणावर राजकीय पातळीवरही आवाज उठू लागला आहे. ‘लोकमदत न्यूज’ ने दि. 10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून जिल्ह्यातील बांधकाम कामगार योजनांमधील कथित भ्रष्टाचार आणि दलालीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्याची दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.13) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य, शैक्षणिक मदत, सुरक्षा साहित्य, विमा संरक्षण तसेच विविध योजनांचा लाभ देण्याची तरतूद आहे. मात्र जिल्ह्यात या योजनांच्या नावाखाली दलाल आणि मध्यस्थांनी अक्षरशः जाळे पसरवल्याचे ‘लोकमदत न्यूज’च्या वृत्तातून समोर आले होते.
धाराशिव शहरातील भारत विद्यालय परिसरात काही दलालांनी बोगस बांधकाम कामगारांच्या नावावर शासनाकडून आलेले साहित्य आणून त्याची उघडपणे दलाली केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पत्रकार घटनास्थळी पोहोचल्याची माहिती मिळताच दलालांनी साहित्य तसेच वाहने सोडून पळ काढल्याचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणामुळे खऱ्या व गरजू कामगारांना योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप करत काही एजंट आणि मध्यस्थ कामगारांना योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ५० टक्के रक्कम कमिशन म्हणून घेत असल्याचे नमूद केले आहे. या ‘अर्धे तुम्ही-अर्धे आम्ही’ पद्धतीमुळे गरीब कामगारांची आर्थिक लूट होत असून शासनाच्या योजनांचा मूळ उद्देशच धोक्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दलाल, मध्यस्थ तसेच यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, कामगारांना कोणत्याही दलालांशिवाय थेट योजनांचा लाभ मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर, पृथ्वीराज मुळे, सहीद पटेल, अल्लानूर पठाण यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ‘लोकमदत न्यूज’ने उघड केलेल्या या प्रकरणामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगार योजनांमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला असून प्रशासन आता या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












