आठवडी बाजार “झिरो” प्रकरणात चौकशीचा वेग शून्यावर! दहा दिवस उलटले… तरी चौकशी गुलदस्त्यात?
धाराशिव, दि. ०४ (अमजद सय्यद) : तामलवाडी पोलीस ठाण्यातील अंमलदार अल्ताफ गोलंदाज याच्यावर व्हायरल व्हिडिओनंतर तात्काळ कारवाई झाली; परंतु धाराशिव शहरातील “झिरो उर्फ तोतया व्यवहार” प्रकरणात मात्र दहा दिवस उलटूनही संवेदनशील चौकशी सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
२५ नोव्हेंबर रोजी आठवडी बाजार परिसरात समोर आलेल्या कथित ‘पिशवी व्यवहार’ व्हिडिओमध्ये रस्त्यावर वाहन अडवत पैसे घेण्याचा प्रकार स्पष्ट दिसून येत असतानाही कारवाईचा वेग नाही. या घटनेवर केवळ एक-दोन नव्हे तर अनेक तक्रारी संबंधित “घुग”ऱ्या खाऊन “बेळ”गाम झालेल्या कर्मचाऱ्याविरुद्ध करण्यात आल्या आहेत. तरीही पोलीस यंत्रणा शांत असल्याने “वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त कोणाला?” असा प्रश्न शहरभर चर्चेत आहे.
तक्रारी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक व छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडेही दाखल मात्र चौकशी अद्याप गुलदस्त्यातच आहे. एवढ्या दिवसांत कोणताही अहवाल, नोटीस, निलंबन किंवा चौकशी समिती नेमण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले, “तामलवाडीत वेग, धाराशिवात ब्रेक!” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
झिरो उर्फ तोतया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटावर शहरातील व्यापारी, वाहन चालक, रिक्षाचालक, तसेच साधारण नागरिकांकडून दीर्घकाळापासून तक्रारी येत आहेत. रस्त्यावर थांबवून व अवैध वाहतूक प्रकरणात रोख रक्कम घेण्याचे प्रकार नित्याचे झाल्याची प्रामाणिक पोलिसांच्या वर्तुळातही नाराजी आहे.
दरम्यान व्हायरल व्हिडिओतील रिक्षाचालक थेट एसपीकडे तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असताना त्यावर दबाव टाकला जात असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, संबंधित कर्मचारी कोणाच्या संरक्षक छत्राखाली कार्यरत आहे? त्याच्यावर एवढ्या तक्रारी असूनही कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिकांकडून जोरदारपणे उपस्थित केला जात आहे.
तोतया पोलिसांचे रॅकेट शहरात आणि जिल्ह्यात सक्रिय आहे, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. “मी पोलीस आहे” अशी बतावणी करून दागिने व रोकड सुरक्षिततेच्या नावाखाली घेऊन फसवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा अंदाज आहे. अशा सर्व तक्रारींचा उलगडा करण्यासाठी संबंधित व्यक्तीची ओळख परेड घेणे अत्यावश्यक असल्याचे मत घटनेने संतापलेल्या नागरिकांनी व्यक्त केले.
दहा दिवसांपासून चौकशीची कोणतीही प्रक्रिया न सुरू झाल्याने यामागचे कारण काय, हे कळत नाही. पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करून प्रकरण पारदर्शक केले नाही, तर यामुळे पोलीस प्रशासनावर अविश्वास वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
आता सर्वांचे लक्ष एसपी व विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे लागले आहे.
धाराशिवातील झिरो / तोतया प्रकरणात तामलवाडीप्रमाणे कडक कारवाई होणार का?
की संरक्षणाचा खेळच कायम राहणार?
नागरिक व प्रामाणिक पोलीस यंत्रणा उत्तराची प्रतीक्षा करत आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












