पत्रकार हुकमत मुलाणी यांचे दुःखद निधन
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) – टुडे समाचारचे संपादक हुकमत हमीद मुलाणी रा. कोंड (वय ४७ वर्षे) यांचे दि.२० सप्टेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कोंड येथील कब्रस्तानमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. यावेळी सर्व पत्रकार, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, सून, नातवंडे, आई, वडील, बहिण व भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांनी अतिशय खडतर प्रवासातून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. प्रारंभी त्यांनी दैनिक जनप्रवास, गावकरी, सकाळ आदी दैनिकांत ग्रामीण भागातील व्यथा मांडून त्या समस्या सोडविण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्यामुळे गरिबांना न्याय मिळण्यासाठी मोलाची मदत मिळाली. प्रिंट पत्रकारितेबरोबरच डिजिटल माध्यमात टुडे समाचारच्या माध्यमातून…दूध का दूध, पानी का पानी…मी हुकूमत मुलाणी…असे म्हणत झिरो ग्राउंड रिपोर्ट म्हणजे संबंधित घटनास्थळी जाऊन दोन्ही बाजू जाणून घेऊन त्या लोकांना दाखवून हृदयस्पर्शी घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद करीत होते. त्या घटनेचे वास्तव व बातमीच्या मागची बातमी जगासमोर उजेडात आणून खरी पत्रकरीता काय असते ? हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी अल्पावधीतच वेगवेगळ्या विषयाला हात घालून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे ते अल्पावधीतच सर्वसामान्यांच्या गळ्यातील पत्रकाररुपी चालते बोलते डिजिटल पत्रकारितेचे ताईत बनले. दि.२० सप्टेंबर रोजी ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बातमीसाठी जाण्याची तयारी करीत असतानाच त्यांना अस्वस्थ होऊन घाम येऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत दुर्दैवाने मालवली. त्यांनी ग्रामीण भागातील बातमीदारी काय असते ? हे शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांनाच दाखवून दिले. विशेष म्हणजे ते बातमीदारी करताना कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता अधिक निडरपणे, दक्षपणे व तेवढ्याच ताकदीने मांडणी करीत होते. त्यामुळे उद्या कोणत्या विषयावर ते बातमी देणार आहेत ? याची उत्सुकता अनेकांना लागलेली असायची. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, निर्भिडवाणी व कोणताही मुलाहिजा न ठेवता मांडण्याची कला त्यांच्या बातमीत ठासून भरलेली असल्यामुळे अनेकजणांना भुरळ घातली होती. त्यांची पत्रकारिता फुलत असतानाच निसर्गाचा हा दुर्दैवी आघात सर्व पत्रकार आणि त्यांच्या पत्रकारितेला हुरहूरी लावणार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने हरहुन्नरी पत्रकार विशेषतः ग्रामीण भागातून ज्या प्रकारे मांडणी करणे आवश्यक होते, अगदी तशीच मांडणी करणारा पत्रकार अचानकपणे कायमचाच निघून गेला आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













