टुडे समाचारचे संपादक हुकूमत मुलानी यांचे हृदयविकाराने निधन “ग्राउंड रिपोर्टिंगची धार गमावली” पत्रकारितेतील निर्भीड आवाज कायमचा थांबला
धाराशिव दि.२०(प्रतिनिधी): टुडे समाचारचे संपादक आणि जिल्ह्यासह राज्यभरात निर्भीड ग्राउंड रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार हुकूमत मुलानी यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली, जावई, एक मुलगा, सून व नातवंडे असा मोठा परिवार असून, त्यांच्या जाण्याने मुलानी व शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हुकूमत मुलानी हे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले होते. प्रतिकूल परिस्थितीत टेलरिंगचा व्यवसाय, रिक्षाचालक म्हणून काही काळ उपजीविका करत त्यांनी घराचा गाडा ओढला. मात्र संघर्षमय आयुष्यातून पुढे येत त्यांनी पत्रकारितेत पदार्पण केले. दैनिक सकाळसारख्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये ग्रामीण भागातील प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले.
कालांतराने त्यांनी डिजिटल माध्यमांचा स्वीकार करत टुडे समाचार या यूट्यूब चॅनलची स्थापना केली. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जाऊन, थेट घटनास्थळी उभे राहून “ग्राउंड रिपोर्ट” करण्याची त्यांची पद्धत नागरिकांच्या मनाला भिडली. “दूध का दूध आणि पाणी का पाणी” तसेच “बातमी आरपार दाखवणार टुडे समाचार” या तत्त्वावर त्यांनी दोन्ही बाजू समोर मांडत सत्य उजेडात आणण्याचे काम केले. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या त्यांच्या यूट्यूब चॅनलने दोन लाखांहून अधिक सबस्क्राईबरचा टप्पा पार केला होता. धाराशिव जिल्ह्यात ते कोट घालून थेट रिपोर्टिंग करणारे पत्रकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले होते.
आज पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हुकूमत मुलानी हे धाराशिव एसटी महामंडळातील सेवानिवृत्त चालक इब्राहिम शेख यांचे ज्येष्ठ जावई होत. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह जिल्ह्यातील नागरिक, राजकीय नेते, अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या मूळ गावी कोंड येथील कब्रस्तानामध्ये दफनविधी करण्यात येणार आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












