जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवसीय धाराशिव फेस्टिव्हल
राज्यस्तरीय कविसंमेलनासह लोककलांचा रांगडा आविष्कार
धाराशिव I
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने यावर्षीपासून दोन दिवसीय धाराशिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १३ आणि रविवार १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात निमंत्रित कवींचे राज्यस्तरीय कवीसंमेलन आणि भूपाळी ते भैरवी या अस्सल मराठमोळ्या लोककलांचा रांगडा आविष्कार रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत.
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने धाराशिव शहर आणि परिसरातील रसिक श्रोत्यांसाठी मोठी सांस्कृतिक मेजवानी यानिमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या धाराशिव महोत्सवात पहिल्या दिवशी शनिवारी १३ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. यात प्रा. प्रशांत मोरे, मुंबई, भरत दौंडकर, पुणे, अविनाश भारती, माजलगाव, यामिनी दळवी, मुंबई, आणि छत्रपती संभाजीनगर येथील नारायण पुरी, गुंजन पाटील आणि नीलेश चव्हाण या राज्यभर सुपरिचित असलेल्या कवींचा समावेश असणार आहे.
शनिवारी सायंकाळी सहा वाजता कविसंमेलनाच्या माध्यमातून या महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफले जाणार आहे. रविवारी १४ सप्टेंबर रोजी सांगली येथील संपत कदम यांच्या सांस्कृतिक पथकाच्या ‘भूपाळी ते भैरवी’ राज्यात आणि देशात गाजत असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेच्या भूपाळीपासून रात्रीच्या लावणीपर्यंत महाराष्ट्राच्या लोककलांचा अस्सल मराठमोळा रांगडा आविष्कार त्यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रातील विविध लोकसंस्कृतीचे सांगीतिक आणि नृत्याविष्कार सादर करीत लोककलांचे दर्शन घडवणारा हा सांस्कृतिक असणार आहे. हे दोन्हीही कार्यक्रम नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात १३ आणि १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले आहेत. धाराशिवकरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे आणि या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे












